Join us

‘त्या’ एका कॉलने वाढतेय पोलिसांची डोकेदुखी; शंभरहून अधिक खोट्या कॉलची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:52 PM

दारूच्या नशेत तसेच मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीसह अल्पवयीन मुलेही कॉल करणाऱ्यामध्ये हाती लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: २६/११ दरम्यान हजारो कॉल एकाच वेळी आल्यामुळे हे नियंत्रण कक्ष कोलमडले होते. सध्या ते कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत ‘साहेब.. बॉम्ब ब्लास्ट होणार...’अशा प्रकारच्या खोट्या कॉलने मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. आतापर्यंत १०० हून अधिक खोट्या कॉलची नियंत्रण कक्षात खणखण झाली. मजा मस्तीसह, कुणाला तरी धडा शिकवण्यासाठी, दारूच्या नशेत तसेच मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीसह अल्पवयीन मुलेही कॉल करणाऱ्यामध्ये हाती लागत आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे या प्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे.

तिथे एक बॉम्ब आहे, मला बाहेर काढा

‘तिथे एक बॉम्ब आहे, मला बाहेर काढा’ असे कॉल करणारी महिला मलबारहिल परिसरात राहते. तिने यापूर्वी १५ दिवसांत कुलाबा व नेपियन्सी रोडवर बॉम्ब असल्याचा दावा करत ३८ हून अधिकवेळा कॉल केले. तिच्याकडे चौकशी करताच ती काहीही माहिती देत नसल्याने पोलिसांच्या डोकेदुखीत भर पडत आहे. ती मानसिक रुग्ण असल्याचा संशय आहे.

मुख्यमंत्र्यांशी बोलणे व्हावे म्हणून...

यापूर्वी मुख्यमंत्र्यांशी बोलणे व्हावे म्हणून अहमदनगरच्या एका व्यक्तीने मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा कॉल ११२ क्रमांकाच्या हेल्पलाईनला केला होता. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दालन परिसराची विशेष तपासणी केली. दीड तास तपासणी केल्यानंतर कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डीतून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. साताऱ्याच्या १० वर्षांच्या मुलाने वडिलांच्या फोनवरून असाच बॉम्ब असल्याचा कॉल केला होता.

टॅग्स :पोलिस