इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:50 AM2024-06-01T11:50:44+5:302024-06-01T11:51:04+5:30
दोन दिवसांपूर्वी देखील इंडिगोच्या विमानात बॉम्ब लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. यावेळी विमानात प्रवाशांमध्ये अफरातफरी उडाली होती.
चेन्नईहून मुंबईला निघालेल्या इंडिगोच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे आज सकाळी हे विमान मुंबईत उतरवून तपासणी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी देखील इंडिगोच्या विमानात बॉम्ब लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. यावेळी विमानात प्रवाशांमध्ये अफरातफरी उडाली होती.
आज पहाटे 6E 5314 फ्लाईटने चेन्नईहून मुंबईला येण्यासाठी उड्डाण केले. हे विमान सकाळी पावणे नऊ वाजता मुंबई विमानतळावर उतरले. यानंतर विमानतळ प्रशासनाची धावपळ सुरु झाली. सर्व प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले नंतर विमान सुरक्षित स्थळी नेण्यात आले व या विमानाची तपासणी करण्यात येत आहे.
चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 5314 ला बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबईत उतरल्यावर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले. सुरक्षा एजन्सीच्या सूचनेनुसार विमान निर्जन ठिकाणी नेण्यात आले. सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
यापूर्वी दिल्लीहून बनारसला जाणाऱ्या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आता शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.