Join us

विमानात बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 7:23 AM

चेन्नईतून शनिवारी सकाळी ६:५० वाजता या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीची माहिती वैमानिकाला मिळाली.

मुंबई : चेन्नईतून मुंबईत येणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात १७२ प्रवासी होते. 

चेन्नईतून शनिवारी सकाळी ६:५० वाजता या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केल्यानंतर विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर त्याने तातडीने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला व त्या धमकीची माहिती दिली. या माहितीनंतर मुंबई विमानतळावर सर्व आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे बंब, रुग्णवाहिका आदी सज्ज ठेवण्यात आले. 

  या विमानाला प्राधान्याने उतरवण्यात आले. अशा स्थितीसाठी निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार या विमानाला विमानतळाच्या मोकळ्या जागेत नेण्यात आले. प्रवाशांना आपत्कालीन मार्ग, नियमित दरवाजांतून सुरक्षित उतरवण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता त्यात बॉम्ब आढळला नाही. मात्र, विमानात तपासणीदरम्यान एक रिमोट कंट्रोल सापडला असून त्याची तपासणी सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठवडाभरात ‘इंडिगो’च्या विमानात बॉम्ब असल्याची आलेली ही दुसरी धमकी आहे.

टॅग्स :विमान