- मनाेज रमेश जाेशी(वृत्तसंपादक)
२३ जून १९८५. एका मोठ्या घटनेने संपूर्ण जग हादरून गेले. नवी दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान हजारो फूट उंचीवर बॉम्बने उडवण्यात आले. विमानातील सर्व ३२९ जणांना क्षणात मृत्यूने गाठले. ही घटना आठवली की अजूनही अंगाचा थरकाप उडतो. आत्ता या घटनेचे स्मरण का? तर गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळत आहेत. सुदैवाने या सर्व धमक्या खोट्या निघाल्या. मात्र, धमक्यांचे सत्र सुरूच आहे आणि कोणत्याही धमकीबद्दल गाफील राहणे परवडणारे नाही. अन्यथा, ‘लांडगा आला रे आला’, अशी गत व्हायची.
सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही धमकी हलक्यात घेतली जात नाही. ९९.९९ टक्के धमक्या खोट्या असतात, हे आम्हाला ठावूक आहे. पण, उरलेल्या ०.०१ टक्के प्रकरणांत काहीही होऊ शकते. बोर्डिंगच्या आधी सर्व प्रवाशांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केलेली असते. त्यांच्या सामानाचीही कडक तपासणी होते. अनेक प्रकारच्या तपासणीतून प्रवाशांचे सामान जाते. या धमक्या खोट्या आहेत, हे माहीत असूनही आम्ही सर्व उपाययोजना आखतो, असे विमान वाहतूक मंत्रालायच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपासात अडचण काय?बहुतांश धमक्या सोशल मीडिया किंवा ई-मेलद्वारे देण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी काहीजणांना अटक केली आहे. मात्र, काहीजण व्हीपीएनचा (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापर करतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण जाते. सरकारने यासंदर्भात सोशल मीडिया कंपन्या ‘मेटा’ आणि ‘एक्स’ला विचारणा केली असून, अशा प्रकारच्या अफवा राेखण्यासाठी काय पावले उचलली? असा सवालही केला आहे. सार्वजनिक हिताशी संबंधित हे प्रकरण असून, सोशल मीडिया कंपन्यांना सहकार्य करावे लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
धमक्या देण्यामागील हेतू काय? गेल्या दोन आठवड्यांत २८० पेक्षा जास्त विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. एअर इंडिया, इंडिगो, आकासा एअर, विस्तारा या भारतातील प्रमुख विमान कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. धमक्या कुठूनही आणि काेणीही दिल्या, तरी त्यांच्या निशाण्यावर भारतीय विमान कंपन्या आहेत. ही एक नियाेजनबद्ध मालिकाच दिसत आहे. राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा धोका आहे. तसेच भारताच्या विकास मार्गात अडथळे आणण्याचा हा प्रयत्न दिसताे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धमकी मिळाल्यानंतर काय केले जाते? मिळालेली धमकी ही बॉम्बची असल्याचे कळल्यावर सर्व प्रवाशांना जवळच्या विमानतळावर उतरवले जाते. त्यांची आणि त्यांच्या सामानाची कसून चौकशी केली जाते.प्रवाशांचे सामान, मालवाहू आणि खानपान साहित्यदेखील ऑफ लोड केले जाते. त्यानंतर रिकाम्या विमानात एअरलाइन, अभियांत्रिकी आणि सुरक्षा कर्मचारी कसून शोध घेतात. तपासणी आणि स्क्रीनिंगमध्ये इतर उपकरणांसह स्निफर डॉग आणि स्कॅनिंग मशीन यांचाही समावेश असतो.
आंतरराष्ट्रीय उड्डाणांत गुंतागुंत वाढते - आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी जेव्हा धमकी मिळते, तेव्हा प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते. त्यासाठी वेगळे प्रोटोकॉल लागू होतात आणि विमान जवळच्या विमानतळावर तातडीने उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातात. - परदेशी एटीसी, तपास संस्था आणि इतर समित्यादेखील यामध्ये समाविष्ट होतात. अशा घटनांमुळे सर्व प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ असते. प्रवाशांना सर्व स्पष्ट होईपर्यंत विमानतळावरच अडवून ठेवले जाते. प्रवाशांची गैरसोय होण्यासोबतच विमान कंपन्यांना मोठा फटका बसतो.
आर्थिक फटका एक उदाहरण घेऊया. ‘बोइंग ७७७’चे कमाल लॅण्डिंग वजन २५० टन आहे. पण, विमान उड्डाण करताना म्हणजे टेक-ऑफच्या वेळी प्रवासी, सामानासह पूर्ण विमानाचे वजन सुमारे ३४०-३५० टन असते.त्या विमानाने पुन्हा दोन तासात लॅण्डिंग करणे, म्हणजे सुमारे १०० टन इंधन हवेत सोडणे; ज्याचा सुमारे एक लाख प्रतिटन, असा एक कोटी रुपये खर्च आहे.विमानतळावर अनपेक्षित लॅण्डिंग आणि पार्किंगचे शुल्क २०० हून अधिक प्रवासी आणि चालक दल यांची राहण्याची व्यवस्था, पुढील फ्लाइट हुकल्याबद्दल त्यांना भरपाई देणे, पूर्ण तपासणीनंतर विमान पुन्हा सेवेत आणण्यासाठी नव्या चालक दलाची व्यवस्था करणे यासारखे इतरही खर्च असतात. त्यामुळे एका विमानासाठी हा खर्च सुमारे ३ कोटी रुपये येतो.आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हा खर्च १० काेटी रुपयांपर्यंत जाऊ शकताे. त्यामुळे २८० विमानांसाठी आत्तापर्यंत ७५०-८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त फटका कंपन्यांना बसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हे प्रकरण विमान वाहतूक क्षेत्रासाठी किती गंभीर आहे, याची कल्पना येते.
१५कोटींपेक्षा जास्त लोकांनी गेल्यावर्षी देशांतर्गत विमान प्रवास केला आहे. ५०विमानतळ देशात आणखी विकसित करण्यात येणार आहेत. २००विमानतळ पुढील २० वर्षांत विकसित करण्याचे लक्ष्य आहे. ४,०००विमानांची गरज त्यासाठी भविष्यात लागणार आहे.७७१विमाने सध्या देशात कार्यरत आहेत.१५०पेक्षा जास्त विमानतळांवर भारतात दररोज तीन हजारपेक्षा जास्त उड्डाणांचे संचलन हाेते. ४,८४,२६३एवढ्या विक्रमी प्रवाशांची देशांतर्गत वाहतूक १४ ऑक्टोबरला भारतातील विमान कंपन्यांनी केली हाेती.