कोसळधारेने मुंबईचा वेग मंदावला; आणखी दोन दिवस मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:16 AM2019-07-25T02:16:10+5:302019-07-25T02:16:26+5:30
१७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद; सखल भागांत साचले पाणी, रस्त्यांसह रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बऱ्याच दिवसांपासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभर मुसळधार कोसळत हवामान खात्याचा अंदाज अखेर खरा ठरविला. हवामान खात्याने २३, २४, २५ आणि २६ जुलै रोजी मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यापैकी २३ आणि २४ जुलै रोजीचा कोटा पावसाने भरून काढला असून, २५ आणि २६ जुलै रोजी पावसाचा मारा कायम राहील, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मंगळवारी रात्रभर पडलेल्या पावसाची बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत १७३.६ मिलीमीटर नोंद झाली असून, कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. परिणामी, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याने ऐन बुधवारी पहाटे काही काळ मुंबईचा वेग मंदावला होता.
कुलाबा येथे १७३.६ मिलीमीटर आणि सांताक्रुझ येथे ८४.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे मुंबई शहर आणि उपनगरात पाऊस कोसळत असतानाच पहाटे ४.२७ वाजता समुद्राला भरती होती. परिणामी, मुंबई शहरात मुख्याध्यापक भवन, सायन सर्कल, हिंदमाता जंक्शन, गांधी मार्केट, जोहरा मंझिल डोंगरी, बीपीटी कॉलनी, नायर रुग्णालय परिसरातील सखल भागांत पाणी साचले होते.
पूर्व उपनगरात पोस्टल कॉलनी, विद्याविहार रेल्वे स्थानक, कुर्ला रेल्वे स्थानक, बैंगनवाडी देवनार, स्वस्तिक चेंबर, चेंबूर रेल्वे स्थानक आणि नेहरू नगर परिसरातील सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात सांताक्रुझ येथील शास्त्री नगर, अंधेरी सबवे, बेहराम बाग आणि मालाड-मालवणी परिसरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. परिणामी, येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले होते.
पश्चिम उपनगरात एके ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला. शहरात ७, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ६ अशा एकूण १४ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. तर, शहरात २, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ६ ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या जीवितहानी झाली नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यांवरील सखल भागांत पाणी साचल्याने हिंदमाता सिनेमा, अंलकार टॉकिज, प्रतीक्षा नगर, गांधी मार्केट या ठिकाणांवरील बेस्ट बसच्या वाहतुकीचे मार्ग सकाळच्या सुमारास काही काळासाठी वळविण्यात आले होते.
विद्यार्थी, रहिवाशांनी केले बोटिंग
विरार येथील विवा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच रहिवाशांनी कॉलेज कॅम्पस परिसरात तुंबलेल्या पाण्यात चक्क बोटिंग करीत आनंद लुटला.