'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 07:28 PM2017-08-29T19:28:20+5:302017-08-29T20:18:49+5:30

सांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासात तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

'Bombay' by! 297 mm rain in 9 hours in the area of ​​Santa Cruz | 'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस

'तुंबई'कर ! सांताक्रुझ परिसरात 9 तासात 297 मिमी पाऊस

googlenewsNext

पुणे, दि. 29 - सांताक्रुझ येथील हवामान विभागात मंगळवारी सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच या ९ तासात तब्बल २९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना २६ जुलैची पुन्हा एकदा आठवण झाली. याचवेळी कुलाबा वेधशाळेत दिवसभरात ६५ मिमी पावसाची नोंद झाली होती. सांताक्रुझ येथे दुपारी अडीच वाजेपर्यंत १२६ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतरच्या ३ तासात तब्बल १७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंतचा हा बहुदा विक्रमी पाऊस असू शकतो. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासात कुलाबा १५१.८, सांताक्रुझ ८८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच डहाणु, तलासरी १९०, हर्णे १८०, महाबळेश्वर १७०, अलिबाग १६०, वलसाड, अकोला ७०, पेण २६०, म्हसाळा, मोखेडा २१०, जव्हार २००, मंडणगड, उरण १७०, माथेरान, रोहा, शहापूर १४०, अंबरनाथ, गुहागर, कल्याण, मुरबाड, मुरुड, उल्हासनगर, विक्रमगड १३०, चिपळूण, खेड, पनवेल, पोलादपूर, संगमेश्वर देवरुख १२०, ओझरखेडा १४०, मोहोळ १००, विदर्भातील अकोट १००, अर्जुनी मोरगांव, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९० मिमी पाऊस झाला.

घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी), डुंगरवाडी २१०, ताम्हिणी, भिरा १९०, शिरगाव १८०, अम्बोणे १५०, दावडी १४०, धारावी १४०, भिवपूरी ११०, खोपोली, लोणावळा (आॅफिस), लोणावळा (टाटा)८० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईला पावसाने सकाळपासून झोडपण्यास सुरुवात केली असून पुन्हा एकदा मुंबईकरांना 26 जुलै 2005 ची आठवण करुन दिली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांनी अत्यंत गरजेचं असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन केलं आहे. सोबतच लोकांनी वाहतूक विभागाचा आदेश पाळण्याची विनंतीही केली आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट किंवा फोन केल्यास पोलीस मदतीला धावून येतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महपालिकेची कंट्रोल रूम सक्रिय असून, पाऊस / शहराशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी १९१६ ला कॉल करा असं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत मुंबईकरांना गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहनही केलं आहे. 'मुंबईतील सर्व पंपिंग स्टेशन्स कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, अतिशय आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा', असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे. 'मुंबईत गेल्या १ तासामध्ये ५२ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांमध्ये अधिक पाऊस अपेक्षित आहे', असंही त्यांनी सांगितलं आहे. 

मुंबई आणि उपनगराला सकाळपासून पावसाने झोडपलं असून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प पडली आहे. दरम्यान मुबईकरांसाठी नेहमी धावणा-या डबेवाल्यांनाही पावसाचा फटका बसला आहे. पावसामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची डबे पोहचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने डबेवाले जागोजागी अडकुन पडले आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशन प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे. 

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा आगमन केलेल्या पावसाने आज सकाळपासूनच मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आहे. मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला जोरदार झोडपलं असून मुंबईची तुंबई झाली आहे. जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचलं असून रस्त्यांना अक्षरक्ष: नद्यांचं स्वरुप आलं आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु असून नेहमी धावणा-या मुंबईचा वेग आज कमी झालेला दिसत आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या असून, कर्मचा-यांना लवकर घरी सोडण्यात आलं आहे. 
 

Web Title: 'Bombay' by! 297 mm rain in 9 hours in the area of ​​Santa Cruz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.