Join us

29 ऑगस्टला तुंबलेल्या मुंबईमुळे प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय, गुढीपाडव्यानंतर बंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 2:49 PM

मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.

ठळक मुद्देमुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहेगुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईलप्लास्टिक पिशव्यांच्या जागी कोणत्या पर्यावरणपूरक पिशव्या आणू शकतो यासंबंधी विचार केला जात आहे

मुंबई, दि. 13 - मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक पिशव्या बंदीसाठी गुढीपाडव्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. गुढीपाडव्यानंतर मुंबईसह राज्यभरात प्लास्टिक पिशव्या बंदी लागू करण्यात येईल अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर प्लास्टिक पिशव्यांमुळे मुंबई तुंबली होती असा निष्कर्ष काढण्यात आला होता. याच पार्श्वभुमीवर प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. 

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार असल्याने प्लास्टिक पिशव्यांच्या जागी कोणत्या पर्यावरणपूरक पिशव्या आणू शकतो यासंबंधी विचार केला जात आहे. यासंबंधी अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे अशी माहितीही रामदास कदम यांनी दिली आहे. 

विशेष म्हणजे याआधी 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरानंतरही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंधाची कारवाई महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती. काही काळ त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली. नंतर मात्र त्यात ढिलाई आली. त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसू लागला. 

कधीही नष्ट होत नाही प्लास्टिक एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो. १९५०च्या सुमारास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ लागला व साठच्या दशकानंतर तो वाढतच गेला. तेव्हापासून निर्माण झालेला एकही प्लास्टिकचा तुकडा अद्याप नष्ट झालेला नाही. तो आजही तसाच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तसाच पृथ्वीवर टिकून आहे. काही प्लास्टिक पिशव्या या इतक्या पातळ असतात की त्यांचा फक्त एकदाच कसाबसा वापर होऊ शकतो. या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. 

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असलेले देश- डेन्मार्कमध्ये २००३ पासून प्लास्टिक पिशव्यांवर रिटेलर्ससाठी कर- वेल्समध्ये २०११ ऑक्टोबरपासून प्लास्टिक पिशव्यांवर शुल्क- इटलीमध्ये २०११पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी- इंग्लडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर शुल्क- अमेरिकेत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी- आर्यलडमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर- मेक्सिकोत २०१० पासून दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दंड- ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी अति पातळ पिशव्या वापरण्यास बंदी- द.आफ्रिकेत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी व शुल्क- चीनमध्ये २००८ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी- बांगलादेशमध्ये २००२ पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी- फ्रान्समध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरासाठी दुकानदारांकडून शुल्क- बेल्जियममध्ये २००७ पासून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर कर 

टॅग्स :मुंबईत पावसाचा हाहाकारमुंबईरामदास कदम