मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चकाला येथील जे. बी. नगरमधील बॉम्बे केंब्रिज इंटरनॅशनल शाळेची वीज व नळजोडणी महानगरपालिकेने तोडल्यामुळे शाळा मागील आठवड्यापासून बंद ठेवण्यात आली आहे. शाळा बंद ठेवल्यामुळे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यासंदर्भात मंगळवारी याविरोधात शिवसेनेकडून अंधेरी-विलेपार्ले विधानसभेच्या वतीने शाळेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत महापालिका प्रशासनाकडून नळ व वीजजोडणी पूर्ववत होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवणार, अशी भूमिका या वेळी शिवसेनेने घेतली आहे.
अग्निशमन दलाने बॉम्बे केंब्रिज इंटरनॅशनल शाळेच्या केलेल्या पाहणीदरम्यान शाळेत अग्नी सुरक्षाबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळेचे वीज व पाणी बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले होते. परंतु पालकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळा प्रशासनाने शाळा बंद केल्यामुळे सुमारे दोनशे ते तीनशे पालकांनी शाळेबाहेर जमा होऊन संताप व्यक्त केला. मंगळवारी सकाळी शाळेच्या आवारात मोठ्या संख्येने पालकांसह शिवसैनिकांनी गर्दी केली होती. तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आमची मुले मागील आठवड्यापासून घरी आहेत. आम्हाला शाळेकडून कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही, देखभालीसाठी शाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले.
महापालिकेने मागील आठवड्यात गुरुवारी शाळेची वीज व नळ जोडणी कापून टाकली. त्यामुळे शाळा मागील शुक्रवारपासून मूलभूत सुविधांअभावी बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत अडीच हजार विद्यार्थी व पालकांना न्याय मिळत नाही; तसेच शाळेची वीज आणि नळ जोडणी पूर्ववत होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे शिवसेना संघटक कमलेश राय यांनी सांगितले. या वेळी धरणे आंदोलनात आमदार रमेश लटके, विधानसभा संघटक सुभाष सावंत, माजी नगरसेवक प्रमोद सावंत आदी कार्यकर्ते व महिला पदाधिकाऱ्यांसह पालक सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांचे नुकसानशाळेतील तीन हजार मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. नववी व दहावीचे विद्यार्थी अंधारात शिक्षण घेत आहेत. शाळा प्रशासनाने सुरक्षेच्या त्रुटी पूर्ण करून शाळेची वीज व नळ जोडणी करून शाळा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांसह पालकांनी केली आहे. त्यामुळै आता हे आंदोलन कधी संपणार याकड ेसर्वांचे लक्ष लागले आहे़