Join us

रात्री घडणार बोटीतून मुंबई दर्शन

By admin | Published: December 16, 2015 2:17 AM

पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीकडून (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन) संध्याकाळी सातनंतर समुद्रात बोटीतून फिरताना गेट वे, तसेच ताज हॉटेल व भोवतालचे दिसणारे

मुंबई : पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीकडून (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन) संध्याकाळी सातनंतर समुद्रात बोटीतून फिरताना गेट वे, तसेच ताज हॉटेल व भोवतालचे दिसणारे नयनरम्य दृश्य त्याचबरोबर ‘राणीचा रत्नहार’ म्हणून ओळख असणाऱ्या मरिन लाइन्सवरील विद्युत रोशणाई यासह मुंबई समुद्राभोवताली असणारी बरीच ठिकाणे, लवकरच पर्यटकांना पाहता येणार आहे. संध्याकाळी सात वाजल्यानंतरही मुंबईतील समुद्रात पर्यटकांसाठी बोट फेऱ्या सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी पोलीस, खासगी बोट मालक व जलवाहतूक प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या बोट फेऱ्यांच्या संघटनांशी बोलणी सुरू असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.सध्या एलिफंटांचे दर्शन पर्यटकांना घडविण्यासाठी बोटींचा वापर होतो, तर अलिबाग-मांडवासाठीही गेट वे येथूनच बोटी सुटतात. अशा जवळपास सरकारमान्य असलेल्या ७0 पेक्षा जास्त बोटी आहेत. त्याचप्रमाणे याच परिसरात खासगी बोट मालकांच्याही बोटी असून, त्यांची संख्या ही ५0 पेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येते. सरकारमान्य बोट फेऱ्या आणि खासगी बोट मालकांना घेऊन, पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी बोटीतून मुंबई दर्शन घडविण्यासाठी एमटीडीसीकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या सुरक्षा मुद्द्यावरच बोलणी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही सेवा पुन्हा सुरू करताना पोलीस, नौदल आणि एमटीडीसीकडून खासगी बोटी व सरकामान्य बोटींसाठी काही नियम आखून देण्यात येतील. सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करणार, सीसीटिव्ही, सुरक्षा रक्षक, संशयित व्यक्तींची, सामानाची तपासणी यासह अनेक प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर बोलणी सुरू असून, ही सेवा सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. (प्रतिनिधी)२६/११ नंतर...२६ नोव्हेंबर २00८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांसह नौदलाकडून रात्रीच्या बोटीच्या फेऱ्यांवर बंदी घालण्यात आली. या हल्ल्यापूर्वी मुंबई हार्बरचे दर्शन समुद्रमार्गे मुंबईकरांना, तसेच पर्यटकांना घडत होते. त्यामुळे पर्यटकांना चालना मिळण्याबरोबरच चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे सांगण्यात आले, परंतु हा हल्ला होताच, रात्रीच्या बोट फेऱ्यांना बंदी घालण्यात आली. आता पुन्हा एकदा एमटीडीसीकडून ही सुविधा सुरू करण्याचा विचार केला जात आहे.