मुंबई - सुमारे २२ एकर अशा विस्तीर्ण परिसरावर पसरलेल्या बॉम्बे डाइंग या मिलच्या जागेची विक्री ५२०० कोटी रुपयांना करण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा कंपनीचे अध्यक्ष नसली वाडिया यांनी बुधवारी केली. या मिलची विक्री होणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ८ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात दिले होते. या घोषणेनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कंपनीच्या समभागधारकांची बैठक बुधवारी पार पडली. यामध्ये या विक्रीचा प्रस्ताव संमत झाला. याकरिता कंपनीने जपानमधील अग्रगण्य सुमितोमो रिएलिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीची उपकंपनी असलेल्या गोईसू या कंपनीशी करार केला आहे. एकूण २ टप्प्यांत या जागेची विक्री होणार असून, पहिल्या टप्प्यांत कंपनीला एकूण ४६७५ कोटी रुपये प्राप्त होणार असून, कराराच्या अटींची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित ५२५ कोटी रुपये कंपनीला मिळणार आहेत.
ताब्यातील अन्य भूखंडांचाही भविष्यात विकास आगामी काळात कंपनीच्या ताब्यात असलेल्या तब्बल ३० लाख ५० हजार चौरस फूट जागेचादेखील विकास करण्याचा कंपनीचा मानस असून, याद्वारे कंपनी १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल करणार आहे. या प्रस्तावालादेखील कंपनीच्या व्यवस्थापनाने तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.