Join us

बॉम्बे डाईंग मिलची विक्री होणार ५ हजार कोटींना?; सौदा अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 6:51 AM

जपानमधील अग्रगण्य बांधकाम समूहासोबत सौदा अंतिम टप्प्यात

मुंबई : उत्तम दर्जाच्या कापडांची निर्मिती करणारी मुंबईतील अग्रगण्य बॉम्बे डाईंग मिलदेखील आता विक्रीच्या उंबरठ्यावर असून या गिरणीच्या १८ एकर जागेसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपये घेऊन ग्राहक कंपनी तयार असल्याचे वृत्त आहे. जर हा विक्री व्यवहार पूर्ण झाला तर तो आजवरचा मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठा जमीन खरेदी सौदा ठरणार आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी विधी क्षेत्रातील एका कंपनीने आपल्या पक्षकाराच्या वतीने वरळी येथील पांडुरंग बुधकर मार्गावरील १८ एकर जागेचा हक्क, टायटल सर्च, मालमत्ता पत्रक, मालक, हरकती आदींची माहिती मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही जाहिरात वाडिया समूहाच्या मालकीच्या बॉम्बे डाईंग कंपनीच्या जमिनीशी संबंधित असल्याची चर्चा बांधकाम क्षेत्रात सुरू झाली होती.

वाडिया समूहाकडून ‘नो कमेंट्स’

सूत्रांच्या मते, १८ एकर विस्तीर्ण जागेवर पसरलेल्या या जमिनीचा सौदा जपानमधील एका अग्रगण्य बांधकाम समूहासोबत अंतिम टप्प्यात आला असून त्यासाठी संबंधित कंपनीने पाच हजार कोटी रुपयांपर्यंत पैसे मोजण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. या जागेची विक्री आणि त्याची किंमत यासाठी वाडिया समूहाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मुंबईच्या पवई परिसरात काही वर्षांपूर्वी ब्रूकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने हिरानंदानी समूहाची कार्यालये व अन्य जागा ६,७०० कोटी रुपयांना विकत घेतली होती. मात्र, ती जागा बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीच्या स्वरूपात होती.

मुख्यालय  दादरला हलणार 

बॉम्बे डाईंगच्या संदर्भात जो सौदा होत असल्याचे वृत्त आहे, ती मोकळी जमीन आहे. त्यामुळे मोकळ्या जमिनीचा हा सर्वात मोठा सौदा होत असल्याचे मानले जात आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यांत असून सध्या या जमिनीवर असलेल्या एका इमारतीमध्ये वाडिया समूहाचे मुख्यालय आहे. मात्र, ते देखील आता तेथून हलविण्याची तयारी सुरू झाली असून दादर येथील नायगाव येथे ते हलविण्यात येत असल्याचे समजते. तर येथेच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील एक हॉटेल असून ते देखील तेथून हलविण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते.

टॅग्स :मुंबईजपान