मुंबई - आरेच्या जंगलात होऊ घातलेल्या मेट्रो-३ च्या कारशेडच्या मार्गातील मोठा अडसर अखेर दूर झाला आहे. येथील कारशेडच्या कामाला विरोध करणारी याचिका आज मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे कुलाबा-सिप्झ- या मेट्रो-३च्या कारशेडच्या आरेमधील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पातील महत्त्वाचा मार्ग असलेल्या कुलाबा-सिप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र या मार्गासाठीच्या आरेमधील प्रस्तावित कारशेडला स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध सुरू होता. त्यामुळे या कारशेडच्या कामात अडथळे येत होते. प्रकरण न्यायालयात जाऊन त्यावर सुनावणी सुरू होती. अखेर आरेमधील कारशेडच्या बांधकामास न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.
मेट्रो-३ हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प कॉर्पोरेशनला २०२१ सालापर्यंत पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पांतर्गत कॉर्पोरेशनने आरे जंगलात सुमारे ३३ एकर जागेची निवड केली आहे. यात आरे कारशेडची उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे. मात्र, या जागेवर कारशेड उभारू नये, यासाठी पर्यावरणप्रेमींनी विरोध करत आहेत.
गोरेगाव येथील आरे वसाहतीत मेट्रो प्रकल्प-३च्या कारशेडसाठी तब्बल २ हजार ७०२ वृक्षांची कत्तल होणार आहे. यावर नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून महापालिकेकडे तब्बल ३३ हजार सूचना व हरकती आल्या होत्या.