मुंबई: मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी 14 ऑगस्टला होणार होती. मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता, ही सुनावणी लवकर घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली होती. त्यामुळे ही सुनावणी सात दिवस आधी घेतली जात आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. याशिवाय आठ तरुणांनी आत्महत्यादेखील केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्यांकडून सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आता घेण्यात यावा. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान टाळता येईल, अशी मागणी करणारी याचिका डिसेंबर 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
मराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 8:39 AM