मुंबई-
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग संख्येच्या वादावर मुंबई हायकोर्टानं महत्वाचा निकाल दिला आहे. मुंबई मनपातील एकूण प्रभाग संख्या २२७ राहणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टानं ठाकरे गटाला धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई मनपातील प्रभाग संख्या वाढवून २३६ इतकी करण्यात आली होती. यास भाजपानं विरोध करत मविआ सरकारचा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप केला होता. राज्यातील सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकारनं रातोरात निर्णय बदलत मुंबई मनपातील प्रभाग संख्या पूर्ववत केली होती.
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णायाविरोधात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली होती. मविआ सरकारनं घेतलेला निर्णय योग्य असून मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता २३६ वॉर्ड असणं गरजेचं असल्याचं राजू पेडणेकर यांनी याचिकेत म्हटलं होतं. राज्य सरकारकडून महाधिवक्ता वीरेंद सराफ यांनी बाजू मांडताना मुंबईतील प्रभाग संख्येची रचना २०११ सालच्या लोकसंख्येच्या आधारावरच केली असल्याचं म्हटलं. तसंच कोरोनामुळे अद्याप जनगणना झालेली नाही त्यामुळे लोकसंख्या वाढीच्या शक्यतेच्या आधारावर प्रभागांची रचना बदलणं योग्य नाही असंही राज्य सरकारच्यावतीनं मांडण्यात आलं. कोर्टानं राज्य सरकारची बाजू मान्य करत शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबई मनपातील प्रभाग संख्या २२७ इतकीच राहणार आहे.