Join us

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पहाटे ३.३० पर्यंत केलं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2018 7:39 PM

लाखो प्रकरणे प्रलंबित असताना कोर्टानं सुटीवर जाणं अनेकांना रुचत नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी मात्र या प्रतिमेला छेद देणारी कृती केली आहे.

मुंबई- 'कोर्टाचं काम आणि सहा महिने थांब'! असं म्हटलं जातं, किंवा तेथे जाणारा वेळ लक्षात घेऊन 'तारिख पे तारिख' सहन करण्याऐवजी कोर्टाची पायरी चढूच नका असा सल्ला दिला जातो. कोर्टाच्या उन्हाळी सुट्यांवरही लोकांचा राग असतो, लाखो प्रकरणे प्रलंबित असताना कोर्टानं सुटीवर जाणं अनेकांना रुचत नाही. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी मात्र या प्रतिमेला छेद देणारी कृती केली आहे. या न्यायाधीशांनी पहाटे ३.३० पर्यंत काम करुन अनेक प्रकरणं मार्गी लावली आहेत. 

त्याचं असं झालं, शुक्रवारी संध्याकाळी पाचनंतर हायकोर्टाची उन्हाळी सुटी सुरु होणार होती. पण अंतरिम आदेशासाठी आलेली प्रकरणं पाहाता न्यायाधीश शाहरुख जे काथावाला यांनी कामकाज सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला. जवळपास १०० नागरी याचिकांमध्ये लोकांना अंतरिम निर्णय अपेक्षित होता असे एका वरिष्ठ विधिज्ञांनी या अभूतपूर्व कामाबद्दल बोलताना सांगितले. या भरगच्च कामकाजामुळे न्या. काथावाला यांचा न्यायकक्ष वकिल आणि संबंधीत याचिकांतील लोक यांनी भरुन गेला होता. तसेच गेला आठवडाभर त्यांनी कामकाज रात्री १२ पर्यंत चालवले होते आणि शुक्रवारी ते रेकाँर्ड मोडून पहाटे ३.३० पर्यंत त्यांनी काम सुरु ठेवले, शेवटच्या प्रकरणापर्यंत ते व्यवस्थित बाजू ऐकून घेत होते असे सांगितले जाते. 

न्यायाधीश काथावाला कामकाज सकाळी दहा वाजता सुरु करतात आणि नेहमीच कोर्टाच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त म्हणजे संध्याकाळी पाचच्या पुढेही काम सुरु ठेवतात. काथावाला यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी संपादन केली आणि त्यानंतर एलएलबीचे शिक्षण गव्हर्नमेंट लॉ कॉलेज येथून घेतले. २००९ साली ते हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीश झाले व २००१ साली ते कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात रुजू झाले 

टॅग्स :उच्च न्यायालयमुंबई