Join us

पती-पत्नीमध्ये 9 वर्षं शरीरसंबंध नाहीत; कोर्टाकडून विवाह रद्दबातल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 2:42 PM

मुंबई उच्च न्यायालयानं लग्न रद्दबातल ठरवलं

मुंबई: उच्च न्यायालयानं 9 वर्षांपूर्वी झालेलं एक लग्न रद्द ठरवलंय. कोल्हापूरमधील एका दाम्पत्यामध्ये लग्नापासूनच कायदेशीर लढाई सुरू होती. फसवणूक करुन कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतली गेल्याचा आरोप महिलेनं केला होता. त्यामुळे हे लग्न रद्द ठरवण्यात यावं, अशी मागणी महिलेनं केली होती. मात्र तिच्या नवऱ्यानं याला विरोध केला होता. या प्रकरणात फसवणुकीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं न्यायमूर्ती मृदूला भटकर यांनी म्हटलं. मात्र तरीही त्यांनी लग्न रद्दबातल ठरवलं. दोघांमध्ये कोणतेही शरीर संबंध नसल्यानं लग्न रद्द ठरवत असल्याचं न्यायालयानं म्हटलं. 'विवाह बंधनात अडकलेल्या दोन व्यक्तींमध्ये नियमितपणे शारीरिक संबंध येणेदेखील गरजेचे असतात. मात्र या प्रकरणात दोघांमध्ये कोणतेही शरीर संबंध नव्हते. त्यामुळेच हे लग्न रद्दबातल ठरवण्यात आलं,' असं न्यायमूर्ती भटकर यांनी निकाल देताना म्हटलं. दोघांमध्ये एकदा तरी शारीरिक संबंध आले असते, तरीही त्यांचं लग्न रद्दबातल ठरलं असतं, असंही न्यायमूर्तींनी म्हटलं. 'सध्या दोघे एकही दिवस सोबत राहत नाहीत. दोघांमध्ये शरीर संबंध आहेत, याबद्दलचा एकही पुरावा पतीकडे नाही. त्यामुळे पुराव्यांअभावी पत्नी लग्न रद्द करण्यासाठी खटला दाखल करु शकते,' असंही न्यायमूर्तींनी म्हटलं. या प्रकरणात पतीनं दोघांमध्ये शरीर संबंध असल्याचा दावा केला होता. यामधून पत्नी गर्भवती राहिल्याचंही त्यांनं सांगितलं. मात्र हे सिद्ध करणारी कोणतीही कागपत्रं पतीला न्यायालयात सादर करता आली नाहीत.  

टॅग्स :उच्च न्यायालयलग्न