Patra Chawl Case: संजय राऊतांचा जामीन रद्द करायला गेली, पण ED तोंडावर पडली; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 08:23 PM2023-02-18T20:23:08+5:302023-02-18T20:23:57+5:30
Patra Chawl Case: संजय राऊतांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या ईडीला मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारल्याचे सांगितले जात आहे.
Patra Chawl Case: मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जामीनावर आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ED) पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक केली होती. तब्बल १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, संजय राऊत यांना मिळालेल्या जामिनाविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने ईडीलाच धारेवर धरत चांगलेच सुनावल्याचे सांगितले जात आहे.
पत्राचाळ कथित गैरव्यवहारप्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात अद्यापही ईडीला यश आलेले नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला जाब विचारला. न्या. एन. आर. बोरकर यांनी ईडीला सुनावले. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी ईडीच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. विशेष न्यायालयाने जामीन देताना दिलेले शेरे रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाला केली आहे.
तुम्ही मुख्य आरोपींना अटक करणार नाही का?
तुम्ही मुख्य आरोपींना अटक करणार नाही का? ते पोलिस कोठडीत नसून न्यायालयीन कोठडीत आहेत. तुम्हाला आरोपीला अंडरट्रायल कैदी म्हणून ठेवायचे आहे का, आणि तुम्ही मुख्य आरोपीला अटक करत नाही? असे प्रश्न न्या. बोरकर यांनी ईडीला केले. यावर, मुख्य आरोपींना अटक न करणे हे संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना जामीन देण्याचे कारण असू शकत नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह केला. तसेच मुख्य आरोपी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, दुसर्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत, परंतु त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती ईडीच्यावतीने उच्च न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचे जबाब घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अटक करण्याची गरज नव्हती, असेही ईडीने स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"