Join us

विवाहित महिलेवर I Love You लिहिलेली चिठ्ठी फेकणं गुन्हा; मुंबई हायकोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:14 PM

विवाहित महिलेच्या अंगावर 'आय लव्ह यू' संदेश लिहिलेली चिठ्ठी, प्रेमपत्र, कविता किंवा शायरी लिहिलेलं पत्र फेकणं गुन्हा आहे. असं करणं छेडछाड किंवा विनयभंगाची खटला दाखल केला जाईल

विवाहित महिलेच्या अंगावर 'आय लव्ह यू' संदेश लिहिलेली चिठ्ठी, प्रेमपत्र, कविता किंवा शायरी लिहिलेलं पत्र फेकणं गुन्हा आहे. असं करणं छेडछाड किंवा विनयभंगाची खटला दाखल केला जाईल, असा निकाल मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे. राज्यातील अकोला जिल्ह्यातील २०११ सालच्या एका घटनेसंदर्भात सुनावणीदरम्यान कोर्टानं निकाल दिला आहे. एका ४५ वर्षीय महिलेसोबत अश्लिल वर्तन आणि तिला धमकी देण्याचा आरोप ५४ वर्षीय आरोपीवर होता. (Bombay High Court's Nagpur bench clarifies that love letter throwing on a married woman is a crime of molestation)

महिलांविरुद्धच्या छेडछाड आणि विनयभंग प्रकरणात आरोपीविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. यात गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. 

नेमकं प्रकरण काय?अकोला जिल्ह्या २०११ साली एक छेडछाडीचं प्रकरण घडलं होतं. ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग आणि धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा देखील आहे. आरोपीनं पीडित महिलेला एक प्रेमपत्र लिहिलं होतं. संबंधित महिलेनं ते स्वीकारण्यास नकार दिला होता. 

विवाहित महिलेनं नकार दिल्यानंतर आरोपीनं पत्र महिलेच्या अंगावर फेकलं आणि तिला 'आय लव्ह यू' म्हटलं होतं. इतकंच नव्हे, तर ही गोष्ट इतर कुणालाही न सांगण्याची धमकी देखील दिली होती. याप्रकरणी सुनावणी देताना कोर्टानं एका विवाहित महिलेच्या शरिरावर प्रेम व्यक्त करणारी कविता किंवा शायरी लिहिलेली चिठ्ठी फेकणं देखील छेडछाड व विनयभंगाचंच प्रकरण आहे, असं स्पष्ट केलं आहे. 

कोर्टानं काय म्हटलं?अकोल्यातील पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयानं आरोपीला २ वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यावर आरोपीनं हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानंही आरोपीला या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. 

"कोणत्याही महिलेची अब्रू हाच तिचा सर्वात मोठा दागिना असतो. महिलेचा विनयभंग किंवा अब्रू नुकसान झाली हे कसं ठरवायचं याची कोणतीही ठराविक व्याख्या सांगता येऊ शकत नाही. हे परिस्थितीवर अवलंबून आहे. विवाहित महिलेच्या अंगावर प्रेमपत्र किंवा शायरी लिहिलेली चिठ्ठी फेकणं व तिला धमकी देणं हे देखील छेडछाडीचंच प्रकरण आहे", असं कोर्टानं नमूद केलं आहे. 

टॅग्स :उच्च न्यायालयनागपूर