बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर

By संतोष आंधळे | Published: October 11, 2024 10:08 AM2024-10-11T10:08:56+5:302024-10-11T10:08:56+5:30

आरास पुढे सांगितले की, आजही कुलाबा येथील ताज हॉटेलच्या मागे अनेक भटकी कुत्री फिरत असतात. त्या सर्वांच्या खाण्याची व्यवस्था त्या हॉटेलमधून करण्यात येत असते.

bombay house the right home for stray dogs | बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर

बॉम्बे हाऊस: भटक्या श्वानांचे हक्काचे घर

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  भारतातील बड्या उद्योग समूहापैकी अग्रस्थानी असलेले विश्वसनीय नाव म्हणजे टाटा उद्योगसमूह. या समूहाचे मुख्य कार्यालय फोर्ट येथील बॉम्बे हाऊस या इमारतीत आहे. या ठिकाणी व्यावसायिक कामाकरिता देश विदेशातील बड्या व्यक्तींची ये-जा असते. त्यामुळे त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात असते. त्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीला जाण्यास मनाई आहे. मात्र, त्या परिसरातील भटक्या श्वानासाठी बॉम्बे हाऊस हे हक्काचे ठिकाण आहे. या कार्यालयात भटक्या कुत्र्यांसाठी तळमजल्यावर मोठी खोली तयार करण्यात आली असून, त्या ठिकाणी भटकी कुत्री आराम करत असतात. त्या ठिकाणी त्यांना राहण्या-खाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. 

सध्याच्या घडीला नियमितपणे आजूबाजूच्या परिसरातील १० ते १२ कुत्री या ठिकाणी राहत आहेत. तसेच भटकी कुत्री कधीही खोलीबाहेर पडून फिरायला जात असतात. या कार्यालयात येणाऱ्या नियमित कर्मचारी सोडून प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जाते. तसेच व्यक्ती कार्यालयात जाण्यायोग्य असेल तरच त्यांना प्रवेश दिला जातो. मात्र, कुत्र्यांचा वावर या ठिकाणी सदैव असतो. तेथील सर्व सुरक्षारक्षकांना त्यांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे अनेकवेळा या कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात आजही कुत्र्यांचा वावर तेथे दिसून येतो. टाटा यांच्या स्वतःच्या घरीसुद्धा टिटो आणि टँगो ही दोन कुत्री आहेत.   

याबाबत अधिक माहिती देताना ‘द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्स’ या श्वानप्रेमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबोध आरास यांनी सांगितले की, “टाटा हे श्वानप्रेमाचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. सध्याच्या काळात ज्यावेळी भटक्या कुत्र्यांविषयी बहुतांश समाजातील व्यक्ती द्वेष निर्माण करीत आहेत, त्याचवेळी टाटा यांनी मात्र त्यांच्या उद्योगसमूहाच्या मुख्य कार्यालयात २० वर्षांपासून भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी व्यवस्था केली होती. पूर्वी ही कुत्री अशीच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फिरत राहायची. मात्र, ज्यावेळी नवीन बॉम्बे हाऊस तयार करण्यात आले, त्यावेळी टाटा यांनी या कार्यालयात तळमजल्यावर विशेष खोलीची व्यवस्था करण्यात आली. त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.  गेली २० वर्षे मी आणि माझे सहकारी या ठिकाणी तेथील श्वानांच्या लसीकरणासाठी, त्यांच्या उपचारासाठी जात असतो. त्या ठिकाणी लसीकरण करत असताना एकदा टाटा त्या खोलीत आले होते.”      

‘रॅम्बो’चा वावर आजही ताजच्या गेटवर  

आरास पुढे सांगितले की, आजही कुलाबा येथील ताज हॉटेलच्या मागे अनेक भटकी कुत्री फिरत असतात. त्या सर्वांच्या खाण्याची व्यवस्था त्या हॉटेलमधून करण्यात येत असते. आजही या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर रॅम्बो नावाचा कुत्रा फिरत असतो. त्याला त्या ठिकाणचे सुरक्षारक्षक कुणीही त्रास देत नाही. उलट या कुत्र्यामधील कुणालाही आरोग्याच्या समस्या उद्भवल्या तर आम्हाला त्यासाठी बोलाविले जाते. दोन महिन्यांपूर्वीच रॅम्बोच्या उपचारासाठी आम्हाला बोलविण्यात आले होते.
 

Web Title: bombay house the right home for stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.