लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खोल खोल समुद्र, वर निळे आकाश, भोवताली फक्त लाटांचा आवाज व लक्ष्य ११०० किलोमीटरचे अंतर पोहत पार करण्याचे, तेही विनाथांबा! मुंबई ते गोवा आणि पुन्हा गोवा ते वसई किल्ला असा हा समुद्री प्रवास करण्यासाठी ६ जलतरणपटू सज्ज झाले असून, त्यात एका १४ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. शनिवारी गेट वे येथून त्यांच्या पोहण्याला सुरुवात होणार आहे.
मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित असतील. तर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर, शाखाप्रमुख दिलीप नाईक आदींनी या संकल्पपूर्तीसाठी प्रयत्न केल्याचे आयोजक जगदीश केळशीकर यांनी सांगितले. वसई-विरार ओपन वॉटर स्विमिंग फाउंडेशन यांनी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सहभागी होणारे जलतरणपटू कार्तिक गुगळे (२०), राकेश कदम (२४), सपना शेलार (२१), जिया राय (१४), दूर्वेन नाईक (१७) आणि राज पाटील (१७) हे सहा जण मुंबई ते डोना पावला गोवा आणि परत वसई किल्ल्यापर्यंत पोहून एकूण ११०० किलोमीटरचे अंतर १५ दिवसांत पूर्ण करतील. यापूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील माऊंटन व्ह्यू २०१९ मध्ये ९५९ किमी समुद्री अंतर पोहून पार केल्याचा विक्रम आहे. हा विक्रम सहा जलतरणपटू मोडणार आहेत.
विनाथांबा कसे पोहणार? सहभागी जलतरणपटूंपैकी एक जण किमान चार तास पोहणार. त्यानंतर तो विश्रांती घेईल. नंतर अन्य सहकारी पुढचे अंतर पोहून पार करेल. अशा पद्धतीने विनाथांबा ११०० किमी अंतर पोहून पार केले जाणार आहे.