Join us

मुंबई विद्यापीठ ७२ परीक्षांत पास; उर्वरित तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 9:59 AM

विद्यार्थ्यांमधून समाधान.

मुंबई :मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रातील ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या ७५पैकी ७२ परीक्षांचे निकाल वेळेत म्हणजे ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत, तर उर्वरित 3 परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्यात आले.

परीक्षा विभागाच्या उपायांमुळे बीए, बीकॉम, बीएस्सी, बीफार्म, बीआर्च अशा ७२ परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करता आले. उन्हाळी सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी बारकोड  व आसन क्रमांकांमध्ये चुका केल्याने अनेक निकाल राखीव राहिले होते. यामुळे त्यांचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर होऊ शकला नाही. 

निकाल वेळेत लावल्याबद्दल विद्यापीठ पाठ थोपटून घेत असले तरी जाहीर निकालातील गोंधळांचा पिच्छा सुटण्याच्या मार्गावर नाही. विद्यापीठाने ऑक्टोबर, २०२२मध्ये घेतलेल्या पाचव्या सत्राच्या बी.एस.सी. परीक्षेच्या निकालाबाबत माटुंग्याच्या जी.डी. रुपारेल महाविद्यालयातील ३५ विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. 

अचूकतेसाठी उपाययोजना :

  बारकोड लिहिण्यात चुका होऊ नये म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाइल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविली. ती फाइल परीक्षा केंद्राने डाउनलोड करून विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली.

  यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास उपलब्ध झाली. परिणामी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहिले नाहीत. विद्यार्थ्यांची परीक्षेसाठीची हजेरीही आता ऑनलाइन घेण्यात येते.

विद्याशाखा                     शिक्षक संख्यामानव्यशास्त्र शाखा    १७,८८७वाणिज्य व व्यवस्थापन शाखा     २६,६३०विज्ञान व तंत्रज्ञान शाखा    १७,१०३आंतरविद्या शाखा    ७,०३७ 

हिवाळी सत्राच्या एकूण परीक्षा- ४३९

आतार्पंयत झालेल्या परीक्षा- ७५ 

 ३० दिवसांच्या आत जाहीर केलेले निकाल- ७२

६.७८ लाख उत्तरपुस्तिकांचे मूल्यांकन :

मुंबई विद्यापीठात उत्तरपुस्तिकाचे मूल्यांकनाचे काम संगणक आधारित प्रणालीच्या माध्यमातून (ओएसएम) केले जाते. आजपर्यंत विद्यापीठाकडे आलेल्या ७,९४,३१२ उत्तरपुस्तिकांपैकी ६,७८,१८४ तपासून झाल्या आहेत.

शिक्षकांचे सहकार्य :

  महाविद्यालयातील शिक्षकांनीही सहकार्य करून उत्तरपुस्तिकेचे मूल्यांकन संगणक आधारित प्रणालीच्या माध्यमातून केले. 

  आजपर्यंत झालेल्या परीक्षांच्या ६८ हजार ६५७ शिक्षकांनी या उत्तरपुस्तिका वेळेत तपासल्या आहेत. 

  ६८,६५७ शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासल्या

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी