मुंबईला कोसळधारांनी झोडपले; बांधकामे कोसळून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 05:55 AM2019-08-03T05:55:56+5:302019-08-03T05:56:00+5:30
चार जखमी; चांदिवली, प्रभादेवी येथील घटना
मुंबई : मुंबई उपनगरात शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत कोसळणाऱ्या पावसात चांदिवली आणि प्रभादेवी येथे बांधकामे कोसळल्याच्या घटना घडल्या. चांदिवली येथील दुर्घटनेत चंद्रकांत शेट्टी (४०) यांचा मृत्यू झाला असून, संदीप कदम, मौलाना चौधरी जखमी झाले आहेत, तर प्रभादेवी येथील दुर्घटनेत कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाºयातून दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सकाळी १० वाजता सुरू झालेल्या पावसाने दुपारी दोननंतर मात्र विश्रांती घेतली. परिणामी, नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकल्याचे चित्र होते.
मुसळधार पाऊस कोसळत असतानाच, शुक्रवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चांदिवलीत म्हाडाच्या इमारत क्रमांक एकची भिंत कोसळली. यात जखमी झालेल्या दोघांपैकी चंद्रकांत शेट्टी यांना घाटकोपर, राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. जखमी संदीप कदम यांना पॅरामाउंट रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मौलाना चौधरी यांच्यावर पॅरामाउंट रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्ययात आले.
दरम्यान, शुक्रवारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रभादेवी येथील किस्मत सिनेमा परिसरातील भगवानदास वाडीच्या कम्पाउंड भिंत कोसळली. या दुर्घटनेत २ महिला जखमी झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत येथील बचावकार्य सुरू होते. गेल्या २४ तासांत ८ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. १० ठिकाणी शॉर्टसर्किट झाले तर १९ ठिकाणी झाडे कोसळली. माहिम येथे रात्रकालीन ब्लॉक
मुंबई : माहिम येथे पादचारी पुलाचे तोडकाम करण्यासाठी ३ -४ आॅगस्ट रोजी रात्री १२.३० ते ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद राहील.
मुंबईत २ हजार ३६.३ मिलीमीटर पावसाची नोंद
च्मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनची कुलाबा येथील वेधशाळेतील वार्षिक सरासरी २ हजार २०३ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथील वार्षिक सरासरी २ हजार ५१४ मिलीमीटर आहे. महत्त्वाचे म्हणजे १ आॅगस्ट २०१९ पर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत २ हजार ३६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या साठ वर्षांत यंदा जुलै महिन्यात सर्वांत चांगला पाऊस झाल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.
च्दरम्यान, ३ आणि ४ आॅगस्ट रोजी पुणे आणि सातारा जिल्ह्णात अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय ५ आॅगस्टपर्यंत गोवा आणि कोकण किनारपट्टीवर ताशी ६० किमी वेगाने वारे वाहतील. समुद्र खवळलेला राहील. परिणामी, मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तर, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
राज्यासाठी अंदाज
३ आॅगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
४ आॅगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल.
५ आॅगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.
६ आॅगस्ट : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल.
झाड पडून महिला जखमी
च्शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजता सायन रुग्णालयाच्या कम्पाऊंड परिसरातील झाडांची फांदी पडून शहनाज बानो या महिला जखमी झाल्या. बानो यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपनगरात जोरदार : श्रावण महिना गुरुवारी सुरू झाला आणि पहिल्याच दिवशी पावसाने विश्रांती घेतली. दुसºया दिवशी मात्र श्रावण सरींऐवजी पावसाने रौद्र रूप धारण केले. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात शुक्रवार सकाळपासूनच पावसाने जोर धरला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायन, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, साकिनाका, अंधेरी, पवई, विद्याविहार, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड, पवई, विलेपार्ले, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. विशेषत: सकाळी १० वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मुसळधार पाऊस पडत असतानाच, वेगाने वाहणाºया वाºयामुळे पावसाचे टपोरे थेंब मुंबईकरांना चिंब भिजवत होते.