लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यावर वैद्यकीय शिक्षण विभागाने अखेर शुक्रवारी बंधपत्रित सेवेच्या (बॉण्ड सर्व्हिस) जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय शाखेतील सर्व उत्तीर्ण डॉक्टरांना बंधपत्रित जागेवर काम करण्याची संधी मिळणार आहे. विभागातर्फे १,४३२ जागा वाढविण्यात येणार असल्याने बंधपत्रित जागांचा प्रश्न संपुष्टात आला आहे.
राज्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय शाखेतील सर्वसाधारण १,७५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांना शासनाच्या किंवा महापालिकेच्या रुग्णालयात एक वर्षाची बंधपत्रित सेवा (बॉण्ड सर्व्हिस) देणे बंधनकारक आहे. मात्र, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या बंधपत्रित जागा विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी म्हणजे १,६०० इतक्याच आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना ही बंधपत्रित सेवा देण्यास अडचण निर्माण होणार होती.
निवासी डॉक्टरांच्या संघटनेने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने यासंदर्भात जागा वाढविण्यासाठी गुरुवारी पत्र दिले होते. त्यानंतर या संबंधात शुक्रवारी बैठक पार पडली. त्यामध्ये सध्याच्या अस्तित्त्वात असलेल्या जागांमध्ये आणखी १,४३२ जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या काही महिन्यापूर्वीच मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता बंधपत्रित जागा कमी पडण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. याउलट, विद्यार्थ्यांपेक्षा जागांची संख्या आता अधिक झाली आहे.
बंधपत्रित जागांची संख्या १,४३२ ने वाढविण्यात येत आहे. आज रात्री ज्या बंधपत्रित सेवा उपलब्ध जागा दाखविण्यात येत होत्या, त्यामध्ये या वाढीव जागा दिसतील.- डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, प्रभारी संचालक.