२ महिन्यांच्या बाळावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:17 AM2023-12-31T10:17:56+5:302023-12-31T10:18:13+5:30

अनिशा या दोन महिन्यांच्या बाळावर नुकतीच वाडिया हॉस्पिटलातील डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली.

Bone Marrow Transplant on 2 Months Baby, Transplantation at Wadia Hospital | २ महिन्यांच्या बाळावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण

२ महिन्यांच्या बाळावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण

मुंबई : जन्माला आल्यानंतर अवघ्या १९व्या दिवशी तिला बबल बेबी सिण्ड्रोमचे (कम्बाइन इम्युनोडेफिशियन्सी) निदान झाले. याचा अर्थ तिला जन्मत:च रोगप्रतिकारशक्ती नव्हती. आपल्या बाळाच्या आगमनाने सुखावलेल्या पालकांच्या पायाखालची जमीनच या बातमीने सरकली. मग सुरू झाला प्रवास तिला या जीवघेण्या आजारापासून वाचविण्याचा. परळ येथील वाडिया हॉस्पिटलात त्यांच्या शोधप्रवासाची यशस्वी सांगता झाली. 


अनिशा या दोन महिन्यांच्या बाळावर नुकतीच वाडिया हॉस्पिटलातील डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली. सर्वात कमी वयात अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया होणारी अनिशा ही भारतातील पहिली बालिका ठरली आहे. एक लाखांत एका बाळाला हा कम्बाइन इम्युनोडेफिशियन्सी हा दुर्मीळ आजार होतो. मंगळुरूत जन्मलेल्या अनिशाला हा आजार असल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. या आजारात लहान बाळांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. मंगळुरूतील डॉक्टरांनी अनिशाला परळ येथील वाडिया हॉस्पिटलात नेण्याचा सल्ला दिला. पालकांनीही वेळ न दवडता निर्णय घेतला. आधीचे त्यांचे बाळ गर्भातील संसर्गामुळे दगावले होते. दुसऱ्या बाळाला त्यांना गमवायचे नव्हते. 

अनिशा सुखरूप घरी
ट्रान्सप्लांटसाठी भारतातील तीन रजिस्ट्रीमध्ये १० पेक्षा जास्त दाते आढळून आले. तिच्या प्रत्यारोपणासाठी योग्य दात्याची खात्री करण्यासाठी सर्व रजिस्ट्री २४ तास काम करत होत्या. त्यातूनच एक योग्य दात्याची निवड करण्यात आली. दात्याकडून स्टेम सेल्स मिळताच वेळ न घालविता अनिशाचे ट्रान्सप्लांट  करण्यात आले. ती आता सुखरूप आहे. 

बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या गुंतागुंतीच्या थेरपींचा वापर करून वाडिया हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर उपचार करणे समाधानकारक बाब आहे. यशस्वी ट्रान्सप्लांटने जीवघेण्या इम्युनोडेफिशियन्सी मात करता येऊ शकते. बबल बेबी सिंड्रोमचे वेळीच निदान झाल्याने त्वरित उपचार करणे शक्य झाले.  वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमने यशस्वी उपचार केल्याने अनिशाला नवे आयुष्य मिळाले.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया हॉस्पिटल.

Web Title: Bone Marrow Transplant on 2 Months Baby, Transplantation at Wadia Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.