- संतोष आंधळे मुंबई : अवयव दानाबाबत हळूहळू का होईना, आपल्याकडे जनजागृती होत आहे. मेंदूमृत अवयवदानामुळे एक व्यक्ती आठ जणांचे प्राण वाचवू शकते, हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती झाले आहे. मात्र, या अवयव दानासोबतच हाडे सुद्धा दान केली जाऊ शकतात, हे बहुतेकांना माहिती नाही. तीन वर्षांच्या अंतराने पहिल्यादांच गेल्या आठवड्यात ५७ वर्षीय मेंदूमृत महिलेने केलेल्या अवयदानामध्ये हाडे दान करण्यात आली. त्याचा कर्करोगाच्या शस्त्रक्रियेत हाडे काढावी लागणाऱ्या रुग्णांसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे रुग्ण पुन्हा सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगू शकतो.
गेल्या काही वर्षांत हाडे दान झाल्यानंतर ती शास्त्रीयदृष्ट्या वैद्यकीय प्रक्रिया करून जतन केली जातात. यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयात बँक तयार करण्यात आली आहे. यापूर्वी जी हाडे दान केली जायची ती याच बँकेत जतन करून ठेवत असत. ५७ वर्षीय मेंदूमृत महिलेने हाडे दान केली, ती सांताक्रूझ येथील नोवो उती (टिश्यू) बँक आणि संशोधन केंद्राकडे २४ ऑगस्टला पाठविण्यात आली.
रुग्णालयातून मागणी येईल त्याप्रमाणे आमच्याकडून हाडे दिली जातात. अनेक रुग्णालये आमच्या संपर्कात आहेत. कृत्रिम धातूच्या प्लेट बसविण्यापेक्षा नैसर्गिक हाडाचा शरीराला फायदाच होतो. परदेशातून जर अशा पद्धतीने हाडे किंवा त्याला ग्राफ्ट असे म्हणतात ते मागविले तर त्याला लाखो रुपये खर्च येतो.- डॉ. अस्ट्रिड लोबो गज्जावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, नोवो उती बँक आणि संशोधन केंद्र
गेल्या वर्षभरात मुंबई विभागात २६ मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले आहे. तीन वर्षांच्या अंतराने शरीरातील सर्वांत मोठे आणि मजबूत असणारे फिकर बोन (मांडीचे हाड) दान करण्यात आले. प्लास्टिक सर्जरी करतानाही त्याचा उपयोग होतो. मात्र यासाठी हाडाच्या दानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.- डॉ. भरत शाह, सरचिटणीस, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समिती
दान केलेल्या हाडांचे करतात काय?आपल्याकडे संपूर्ण देशात हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असतात. अपघातात हाडाचा भुगा होतो, त्या ठिकाणी या दान केलेल्या हाडाचा वापर होतो. तर काही ठिकाणी हाडाचा तुकडा खराब झाल्यामुळे काढला जातो. बँकेत आलेल्या हाडाचे विविध आकारात रुपांतर केले जाते. त्याच्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून उणे ८० डिग्री सेल्सिअसला बँकेत जतन करून ठेवले जाते.
किती अवयव देता येतात? एक मेंदूमृत व्यक्ती दोन किडन्या, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, दोन डोळे, दोन हात आणि त्वचा दान करू शकते. मात्र यासोबतच उती पेशी, हाडेसुद्धा दान करता येतात.