मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील २५ हजार ९३९ बंदर व गोदी कामगारांना २०१९-२० या वर्षाकरिता प्रचलित योजनेनुसार बोनस देण्याचे आदेश केंद्रीय नौकानयन मंत्रालयाचे सचिव राजीव नयन यांनी सर्व पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षना दिले असून, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना १९.०४ टक्के म्हणजेच १५ हजार ९९४ रुपये बोनस मिळणार आहे.
बोनस देण्यासाठी पगाराची मर्यादा ७ हजार रुपये असेल. बंदर व गोदी कामगारांना बोनस देण्याची मागणी अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अध्यक्ष एस. के. शेट्ये व जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी केंद्रीय नौकानयन मंत्रालयाकडे केली होती. मुंबई बंदरात ६४३० कामगार असून त्यांना बोनस वाटण्यासाठी १० कोटी २८ लाख रुपये खर्च येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मारुती विश्वासराव यांनी सांगितले.