अॅप आधारित तिकिटावर रेल्वेकडून मिळणार बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 06:08 AM2019-04-09T06:08:12+5:302019-04-09T06:08:21+5:30
तिकीट खिडक्यांवरील रांगेतील गर्दीतून सुटका करण्यासाठी तसेच लोकल तिकीट मिळविण्यासाठी मोबाइल तिकिटांचा वापर वाढविण्यासाठी वॉलेट रिचार्जवर पाच टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासने मोबाइल तिकिटांसाठी आर वॉलेट रिचार्जवर ५ टक्के बोनस देण्याच्या प्रक्रियेला ६ महिन्यांसाठी मुदतवाढ दिली. यामुळे २४ आॅगस्टपर्यंत आर वॉलेट रिचार्ज रकमेवर प्रवाशांना ५ टक्के वाढीव रक्कम वॉलेटमध्ये जमा होईल.
तिकीट खिडक्यांवरील रांगेतील गर्दीतून सुटका करण्यासाठी तसेच लोकल तिकीट मिळविण्यासाठी मोबाइल तिकिटांचा वापर वाढविण्यासाठी वॉलेट रिचार्जवर पाच टक्के अतिरिक्त बोनस देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. लोकल तिकीटसाठी स्मार्ट कार्ड, एटीव्हीएम, जेटीबीएसदेखील उपलब्ध आहे. यासाठी यूटीएस अॅप डाऊनलोड करणाऱ्या धारकांची संख्या १२ लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे. २०१८-१९ मध्ये ५४ लाख १० हजार मोबाइल तिकिटांची विक्री झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मोबाइल रिचार्ज रकमेचे पाच टक्के प्रवाशांच्या वॉलेटमध्ये जमा होत होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना संपुष्टात आली आहे.
प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने आता या योजनेला सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.