मुंबई - गेल्या दिवाळी सणानिमित्त पालिकेमार्फत देण्यात आलेला बाेनस बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या पगारातून कापण्यास सुरूवात केली आहे. बेस्ट उपक्रमाने सुधारणा न केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचे पालिकेने तसे जाहीर केले होते. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. याचे पडसाद आजच्या बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. त्यानंतर बोनसची रक्कम पगारातून कापण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने मागे घेतला.
बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांना पगारही वेळेवर मिळत नाही. कामगारांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी पालिकेकडून २५ कोटी रुपयांची मदत घेतली होती. ही रक्कम बेस्ट उपक्रमाने सुधारणा केल्यास कापले जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र बेस्टने सुधारणा न केल्याने आयुक्तांनी बोनसची रक्कम पगारातून कापण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे साडेपाच हजाराच्या हिशाेबाने कामगारांच्या पगारातून दरमहा पाचशे रुपये कापले जात आहेत.
याबाबत भाजपाचे बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सभा तहकूब करण्याची सुचना मांडली. बोनसची रक्कम पगारातून कापण्याच्या निर्णयावर सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर महाव्यवस्थापकांनी बोनसची रक्कम पगारातून कापली जाणार नसल्याचे जाहीर केले. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.