मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खुशखबर दिली आहे. यावेळी दिवाळी सणासाठी त्यांना २९ हजार रुपये बोनस मिळणार असून सामाजिक आरोग्य स्वयंसेविका आणि बालवाडी शिक्षिका- मदतनीस यांनाही अनुक्रमे १२ हजार आणि ५००० रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील वर्षी कर्मचारी आणि अधिकारी यांना २६ हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा त्यात तीन हजार रुपयांची वाढ झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
पालिकेतील विविध कामगार, कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी- कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्याबाबत विशेष मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्यमंत्री व महानगरपालिका आयुक्त यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर याबाबतचा निर्णय आता घोषित करण्यात आला आहे.
याचा लाभ अधिकारी-कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालिकेच्या प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण सेवक (अनुदानित- विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते, शिक्षकेतर कर्मचारी, पूर्ण वेळ शिक्षण सेवक (अनुदानित-विनाअनुदानित) यांना मिळणार आहे.
चार वर्षांत बोनस दुप्पट- २०२० साली आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर १५ हजार ५०० रुपये बोनस दिला जाणार होता. मात्र, ही रक्कम वाढवून २० हजार इतकी करण्यात आली. - मात्र, रक्कम वाढवताना पुढील तीन वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ मिळणार नाही, अशा शर्तीसह प्रशासनाने कामगार संघटनांसोबत करार केला होता. मात्र, महायुती सरकार आल्यानंतर पूर्वीचा करार रद्द करून २० हजार रुपयांऐवजी ही रक्कम २२ हजार ५०० एवढी करण्यात आली. - मागील दिवाळीत रकमेत वाढ होऊन तीच २६ हजारांवर नेण्यात आली. यंदाही त्यात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.