Join us

बोनसने आणली पॉवर; वीज कामगारांत आनंद

By सचिन लुंगसे | Published: November 09, 2023 6:26 PM

गेल्या दोन एक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरू होती.

मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील महानिर्मिती, महापारेषण, महावितरण कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांना १८,५०० तर सहाय्यक कामगार यांना १२,५०० बोनस जाहीर झाला आहे. त्यामुळे ७४ हजार ८४४ कर्मचारी, अभिंयते आणि अधिकारी व ३ हजार ९०९ सहाय्यक कर्मचारी व ट्रेनी अभियंते २३ यांची दिवाळी गोड झाली आहे.गेल्या दोन एक दिवसांपासून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेसह वीज उद्योगातील सर्वच कामगार संघटनांची बोनसबाबत चर्चा सुरु होती. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र, महापारेषणचे अध्यक्ष संजय कुमार, महानिर्मितीच्या अध्यक्ष पी.अनबलगन आणि तिन्ही कंपन्यांचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी मोहन शर्मा, कृष्णा भोयर, आर.टी, देवकात, सुहास खुमकर, दत्तात्रय गुट्टे असे २७ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते, अधिकारी, सहाय्यक कर्मचारी चांगली कामगिरी करत असून, महसुलाता वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या वीज चोऱ्या उघड करुन अतिरिक्त महसूल मिळवून दिला आहे. सोबतच महानिर्मितीचे सर्वच संच यांनी सर्वोच्च कामगिरी करत विक्रमी वीज निर्मिती करत १३५ कोटींचा नफा मिळवून दिला आहे. महापारेषण कंपनीस चांगल्या कामगिरीमुळे १ हजार कोटीचा नफा कामगारांनी मिळवून दिला आहे, असे अनेक मुद्दे कामगार संघटनांनी मांडले.प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापन यांनी कामगार संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बोनस जाहीर केला. सर्व कर्मचाऱ्यांना बोनस दिवाळीपूर्वी बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

टॅग्स :दिवाळी 2023मुंबई