मुंबई : मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पार्किंगची समस्या जटिल होत आहे. पार्किंगच्या डोकेदुखीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिका ॲप विकसित करणार असून मुंबईकरांना घराबाहेर पडण्यापूर्वीच पार्किंग लॉट बुक करता येणार आहे. या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी पालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली आहे.
मुंबईतील खासगी सोसायट्या, ‘म्हाडा’, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळ्या जागेत पार्किंगची जागा पालिकेकडून निश्चित करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर ऑन रोड व ऑफ रोड पार्किंगचीही सुविधा पालिकेकडून दिली जाणार आहे. सध्या पार्किंगसाठी खासगी जागांसह पे ॲन्ड पार्किंग व पालिकेचे उपलब्ध ३२ वाहनतळेही अपुरे पडत आहेत. पार्किंगच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पालिका पार्किंग धोरणांतर्गत विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहेत.
ॲपमुळे १ लाख २५ हजार ५१० वाहने ऑन रोड, ऑफ रोड पार्क करता येणार. मुंबईबाहेर जाताना कार किंवा कोणतेही वाहन पार्क केल्यानंतर वाहन चोरीला जाण्याचा प्रश्न मिटणार मुंबईकरांना ते किती वेळासाठी गाडी बुक करणार तो स्लॉट बुक करता येणार.
ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा हा एक मोठा प्रकल्प असून पालिकेचे सर्व उपलब्ध पार्किंग लॉट्स आणि एमएमआरडीए, पोर्ट ट्रस्ट, रस्त्यालगत, खाजगी गृहनिर्माण संस्थांच्या पार्किंगसाठी उपलब्ध असलेल्या जागा एकाच सॉफ्टवेअर इंटरफेस अंतर्गत आणल्या जातील. त्यामुळे लोकांना मोबाइल व इतर गॅझेट्सद्वारे संपूर्ण मुंबईत आठवड्यातील २४ तास उपलब्ध सर्व पार्किंग लॉट्सबद्दल माहिती मिळू शकेल. परदेशात पोहोचण्यापूर्वी पार्किंग स्लॉट बुक केला जातो त्याच प्रमाणे मुंबईकरांना आगाऊ पार्किंग लॉट बुक करता येणार आहे. - पी. वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त