कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुस्तक व्यवसाय संकटात
निखिल सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या संसर्गाचा जोरदार फटका पुस्तक व्यवसायाला बसला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये या व्यवसायाचे आर्थिक गणित कोसळले होते. त्या फटक्यातून सावरत नाही, तोच आता दुसरा लॉकडाउन लागल्यामुळे हा व्यवसाय गाळात पोहोचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या निर्बंधांमुळे पुस्तक व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. वाहतुकीवर घातलेल्या निर्बंधांमुळे पुस्तकांची ऑनलाईन उलाढालही ठप्प झाली आहे. त्यामुळे आता पुस्तक विक्रेत्यांना कामगारांचे पगार, वीजबिलाची समस्या भेडसावू लागली आहे.
पुस्तक व्यवसायाला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा, अशी मागणी पुस्तकप्रेमी व पुस्तक विक्रेत्यांकडून होऊ लागली आहे.
आयडिअल बुक स्टॉलचे अनिकेत तेंडुलकर म्हणाले की, सध्या कोरोनामुळे सर्व दुकाने बंद आहेत. याचा फटका आम्हाला बसला आहे. याआधी दिवसाला २० ते २५ हजार रुपयांची पुस्तक विक्री होत असे; मात्र आता दोन हजारांची पुस्तकेदेखील विकली जात नाहीत. दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकांची संख्याही मंदावली आहे. याआधी दिवसाला पुस्तक खरेदी करण्यासाठी अंदाजे १०० ग्राहक येत होते. मात्र आता दोन ग्राहक देखील येत नाहीत. दुकान स्वतःच्या मालकीचे असल्याने मासिक भाड्याच्या प्रश्न उद्भवत नाही. मात्र कामगारांचे पगार, वीज बिल व इतर किरकोळ खर्च द्यावे लागतात. मागील एक वर्षापासून आम्हाला आर्थिक अडचण भासत आहे. अनेक कामगारांना आपले काम सोडून घरी बसावे लागले आहे.
नवनीत बुक स्टोअरचे प्रसाद शिगम म्हणाले की, अनेक दिवस दुकान बंद असल्यामुळे दुकानाची देखभाल होत नाही. त्यामुळे दुकानामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी पुस्तके कुरतडण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच अनेक पुस्तकांना वाळवीदेखील लागली आहे. त्यामुळे आम्हाला ती पुस्तके तशीच रद्दीत फेकून द्यावी लागत आहेत. कामगारांचा पगार सध्या स्वखर्चातूनच देत आहोत. मध्यंतरी पुस्तक व्यवसाय रुळांवर येत होता; मात्र परत एकदा लॉकडाऊन लागल्यामुळे व्यवसाय पुन्हा एकदा तोट्यात गेला.
प्रमोद बुक स्टोअरचे प्रमोद पांडे यांच्या म्हणण्यानुसार अनेक ग्राहकांनी ॲडव्हान्समध्ये पुस्तके मागविली होती. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यामुळे ती पुस्तके दुकानातच पडून राहिली व आम्हाला तोटा सहन करावा लागला.
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन, टीव्हीपेक्षा पुस्तके वाचण्याची जास्त आवश्यकता आहे. कर्नाटक सरकारने पुस्तकांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये केला. त्याचप्रमाणे राज्यातही पुस्तके विक्रीला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला पाहिजे, असे किताबखाना बुक शॉपचे व्यवस्थापक टी. जगत यांनी सांगितले.