पुस्तकच आयुष्याचे मार्गदर्शक - दिव्य प्रकाश दुबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 02:17 AM2020-01-09T02:17:27+5:302020-01-09T02:17:42+5:30
चांगली पुस्तके ही आयुष्याची मार्गदर्शक असतात.
मुंबई : चांगली पुस्तके ही आयुष्याची मार्गदर्शक असतात. कारण पुस्तके ही आयुष्याच्या प्रवासात मित्र-आई-वडील अशा सर्व भूमिकांमध्ये आपल्यासोबत कायम असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तकांशी नाळ जोडून ठेवावी, असे प्रतिपादन नवोदित लेखक - कथाकार दिव्य प्रकाश दुबे यांनी केले.
परळ येथील आयटीसी हॉटेल येथे बुधवारी सायंकाळी प्रभा खेतन फाउंडेशनच्या वतीने लेखक - कथाकार दिव्य प्रकाश दुबे यांचा संवादात्मक कार्यक्रम आयोजिला होता. ‘लोकमत’ आणि ‘अहसास संस्थे’चे या कार्यक्रमाला साहाय्य लाभले. या कार्यक्रमाला व्हेन्यू पार्टनर आयटीसी हॉटेल आहे. या कार्यक्रमाला आयटीसी हॉटेलचे महाव्यवस्थापक अमित कुमार यांचे विशेष साहाय्य लाभले. ‘अक्टूबर जंक्शन’, ‘मसाला चाय’ या पुस्तकांचे लेखक - कथाकार दिव्य प्रकाश दुबे यांनी त्यांचा लेखन प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. या संवादात मुलाखतकार म्हणून अहसासच्या करिश्मा मेहता यांनी जबाबदारी सांभाळली.
याप्रसंगी, दुबे यांनी सांगितले की, मी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे़ आमच्या घराण्यात शासकीय अधिकारी होण्याची परंपरा वर्षानुवर्षे होती. त्याचा काहीसा अप्रत्यक्ष दबाव तारुण्यात माझ्यावर होता़ मात्र त्याची सक्ती वडिलांनी कधी केली नाही. परिणामी, मी इंजिनीअरिंग, एमबीए आणि आता लेखक, कथाकार असा काहीसा करिअरिस्टीक पिढीला छेद देणारा प्रवास अनुभवला. ऐन उमेदीच्या काळात एका शाळेसाठी गीत लिहिले होते. त्यासाठी हजार रुपये मिळाले होते. ज्यांनी ते काम दिले होते त्यांनी शब्दांतूनही पैसे कमविता येतात हे लक्षात ठेव, असे आवर्जून सांगितले.
माझ्यावर विवेकानंद, रजनीश आणि मध्य प्रदेशचे लेखक ज्ञान चतुर्वेदी यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यामुळे काहीसे विरोधाभासातले, सतत आजूबाजूच्या वातावरणामुळे येणारी अस्वस्थता मी अनुभवत असतो. यातून जास्तीतजास्त आजच्या काळातले, रोजच्या जगण्यातले वास्तव माझ्या लिखाणातून उमटत असते. माझ्या लिखाणाचा वाचकगट केवळ तरुण नसून त्यात साठीच्या आजीआजोबांचाही समावेश आहे, ही समाधानाची बाब आहे. आजच्या पिढीला नयीवाली हिंदी द्यायचा प्रयत्न करतोय, त्यात एका ठरावीक तांत्रिक भाषेचा समावेश नसून कनेक्ट होणाऱ्या संवेदनशीलपूर्ण, भावनापूर्ण भाषेचा समावेश आहे. भाषा ही कुठल्या कंपनीत तयार होत नसते, ती नाक्या-नाक्यांवर बोलणाºया संवादातून घडत असते, या विचारांचा मी आहे.
>कथाकथनाशी नाळ जोडा
लहान मुलांची कथाकथनाशी नाळ जोडा. त्यातून त्यांना वाचनाची गोडी लागेल, माझ्या घरातील लहानग्यांनाही मी तेच सांगतो. तर तरुणाईला स्मार्टफोनपासून पुस्तक वाचनाशी जोडून घेण्यासाठी आॅडिओबुक्स, ईबुक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. शिवाय आजच्या पिढीचे लेखक असल्याने तरुणाईच्या भाषेत सातत्याने लिखाण होत आहे, त्यामुळे वाचन संस्कृती पुन्हा विस्तारेल, असा विश्वास आहे.
- दिव्य प्रकाश दुबे, लेखक - कथाकार
>साहित्य-संस्कृतीचा मिलाप
साहित्य संस्कृतीचा मिलाप घडवून आणण्यासाठी अशा स्वरूपाचे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देतो, जेणेकरून आजच्या स्मार्टफोनच्या काळातही वाचनसंस्कृतीला बळ मिळावे. या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरातील लेखक, साहित्यिक आणि कवी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडत आहेत. या उपक्रमात तरुण पिढीसह अनेक ज्येष्ठ नागरिकही उपस्थित राहत असल्यामुळे याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- स्वाती अगरवाल, अहसास
>नवीन लेखक-लेखिकांची पिढी घडेल हा विश्वास
आजच्या कार्यक्रमात लेखक - कथाकार दिव्य प्रकाश दुबे यांचा अनोखा प्रवास साहित्य रसिकांसमोर उलगडला. ही केवळ साहित्य रसिकांसाठी पर्वणी नसून ही प्रेरणा आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून भविष्यात नवीन लेखक - लेखिकांची पिढी घडावी, अशी आशा आहे. आजच्या मुलाखतीत दुबे यांच्या आयुष्यातले अनेक यशापयशाचे प्रसंग त्यांनी उलगडले. या अनुभव कथनातून शब्दांमध्ये किती ताकद असते याची जाणीव झाली. त्यामुळे जास्तीतजास्त लोकांपर्यंत हे व्यासपीठ पोहोचावे, अशी आमची इच्छा आहे.
- करिश्मा मेहता, अहसास (मुलाखतकार)
>साहित्य साक्षरतेचा प्रयत्न
मागील दीड वर्षापासून विविध स्तरातील लेखक, विविध साहित्य प्रकारातील व्यक्तिमत्त्व या उपक्रमाशी जोडून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने समाजाच्या जगण्याचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडत आहेत. हे व्यासपीठ साहित्य साक्षरतेचे आहे, त्यामुळे समाजाच्या तळागाळात ही साहित्य साक्षरता पोहोचावी हा आमचा उद्देश आहे.
- केतकी भाटिया, अहसास