कोविड-१९ आजार, लक्षणे, उपचार, बरे झाल्यानंतर घ्यायची काळजी तसेच निदान याचे महत्त्व सांगितले आहे. उपचार व लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यात औषधाचा शोध ते उपचार याचा आढावा घेतला आहे. कोविड काळात काय करावे, काय करू नये, याची सामान्यांना माहिती दिली आहे. हात धुणे, मास्क लावणे, योग्य अंतर ठेवणे आदींचे महत्त्व पटवून दिले आहे. कल्पित कथांचा डॉ. पारिख यांनी समाचार घेतला आहे. कट, कारस्थान आणि सिद्धांत यावर भाष्य केले आहे. कोविडमधील गोंधळ आणि वुहानमध्ये कोरोनाचे
सर्वप्रथम निदान करणारे व नंतर कोरोनाचे बळी ठरलेले डॉ. लि. वेनलिआंग यांच्यावरील घटनाक्रमावरही एक प्रकरण आहे. कोरोना आजाराचे झालेले राजकारण, सामाजिक माध्यमांतील घटनाक्रम, या माध्यमाची काळी बाजू, वैद्यकीय नियतकालिके, कोविड वेबसाईट यांचाही परामर्श घेतला आहे. कोविडचे अर्थशास्त्र हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्था, रोजगारावर झालेला परिणाम मांडला आहे. यात जगभराचा आढावा घेतला आहे. आरोग्य सेवेवरही भाष्य केले आहे. कोविडमुळे झालेल्या परिणामांचे चिंतनही डॉ. पारिख यांनी केले आहे. वैद्यकीय क्षेत्र, अभ्यासकांपासून सर्वसामान्यांना हे पुस्तक निश्चितच साध्या, सोप्या शब्दांत विविधांगी माहिती देते.
– योगेश बिडवई
दि करोना वायरस
लेखक : डॉ. राजेश पारिख (अनुवाद : डॉ. मिलिंद शेजवळ)
प्रकाशक : संगणक प्रकाशन
मूल्य : २०० रुपये