'केशवायनमः' हा ग्रंथ गुरुजन आणि शिष्य यांच्यातील नाते-संबंधांचा अस्सल दस्तावेज - डॉ. जब्बार पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 01:27 PM2021-11-15T13:27:13+5:302021-11-15T13:27:57+5:30
Keshavayanam: 'केशवायनमः' हा ग्रंथ गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांचा अस्सल दस्तावेज आहे असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
मुंबई - शिक्षकाच्या प्रति भावना व्यक्त करण्यासाठी सुमारे २१ वर्षांनंतर विद्यार्थी एकत्र येतात आणि इतक्या सुंदर दस्तऐवजाचे प्रकाशन करतात हे पाहून ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या आजच्या पिढीतील विद्यार्थांना, आजचा समारंभ एक परिकथाच वाटेल. 'केशवायनमः' हा ग्रंथ गुरू आणि शिष्य यांच्यातील नातेसंबंधांचा अस्सल दस्तावेज आहे असे मत ज्येष्ठ सिने-नाट्य दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.
१९८० च्या दशकातील विद्यार्थीप्रिय आदर्श गणित प्राध्यापक केशव शिदू कर्णे यांचे शिक्षणकार्य व त्यांच्या समृद्ध आठवणींवर आधारित, 'केशवायनमः' या ग्रंथाचे प्रकाशन पुणे येथे डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे उपस्थित होते. यावेळी मीनाक्षी कर्णे या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. 'संस्कृती प्रकाशन' च्या सुनीताराजे पवार आणि ग्रंथाचे संपादक डॉ. ज्ञानेश्वर डोके व्यासपीठावर उपस्थित होते. कर्णे सर स्मृतिग्रंथ समितीने या ग्रंथाची निर्मिती केली असून 'संस्कृती प्रकाशन' तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
पटेल पुढे म्हणाले, हा एक चांगला संदर्भ ग्रंथ झाला असून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पेरलेले शिक्षणाचे बिज आज फलद्रुप होताना दिसत आहे. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे धामणीसारख्या दुर्गम भागात देखील शिक्षणाची गंगा पोहोचली. यामुळे आज धामणी गावातील सुशिक्षित तरुण पुणे, मुंबई आणि अगदी परदेशांत देखील विविध क्षेत्रात नावलौकिक कमवित आहे. महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत आज निम्म्याहून अधिक रयतचे विद्यार्थी आहेत हे अभिमानाने म्हणावेसे वाटते.
ग्रंथाचे संपादक डॉ ज्ञानेश्वर डोके म्हणाले, १९७६ साली कर्णे गुरूजी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणीच्या कनिष्ठ महाविद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण करतानाच आपल्या शिष्यांना पुढील आदर्श जीवनासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सरांचे २००० साली अल्प आजाराने निधन झाले. या छोट्या खेड्यात शिकलेले, विविध क्षेत्रात काम करणारे कर्णे सरांचे विद्यार्थी आजही सरांच्या आठवणीने व्याकुळ होतात. एका लेखाच्या निमित्ताने सुरू झालेल्या सरांच्या आठवणी संकलनातून, शेकडो शिष्यांच्या प्रयत्नातून गुरूंच्या आठवणी जागवत या स्मृतिग्रंथाची निर्मिती झाली आहे. या ग्रंथनिर्मिती आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो शिष्य एकत्र आले आहेत.