मुंबई : गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या परीक्षांसह अन्य परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परीक्षांचा ताण घेतात. कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला कमकुवत बनवत असते. पण जर दृढ निश्चय असेल तर आपल्याला कोणीही यशापासून दूर ठेवू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी करण्यासाठी ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वारियर्स’ पुस्तकाचे प्रकाशन गावदेवी येथील शारदा मंदिर शाळेत करण्यात आले. या वेळी अमृता फडणवीस बोलत होत्या. त्यांनी सांगितले, मुले व विद्यार्थ्यांच्या मनातून परीक्षेची भीती संपवण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. मुलांनी निर्भयपणे जीवनाच्या विकासासाठी योग्य, उचित व सशक्त मार्गाची निवड करण्याची सूचना त्यांनी केली.या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक संदेश देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयातच फक्त परीक्षा होते असे नाही, तर आयुष्यात प्रत्येक क्षणाला परीक्षा होत असते. या सर्व परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा, ब्ल्यूक्राफ्टचे अध्यक्ष अॅड. हितेश जैन, दिव्यज् फाउंडेशनच्या पल्लवी श्रीवास्तव, ‘परमवीर’च्या लेखिका मंजू लोढा आणि केविन शाह उपस्थित होते.
परीक्षेची भीती कमी करणारे पुस्तक - अमृता फडणवीस; पंतप्रधानांच्या ‘एक्झाम वॉरीयर्स’ पुस्तकाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 3:20 AM