मुंबई : घाटकोपर ते वर्सोवादरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाइन तिकीट काढण्याची योजना आणली आहे. प्रवाशांना मेट्रोचे तिकीट व्हाॅट्सॲपवर काढता येत असून यामुळे रांगेत उभे राहण्याचा प्रवाशांचा वेळ वाचत आहे. इतकेच नव्हे तर मेट्रोचे हे तिकीट प्रवाशांना कुठूनही बुक करता येत आहे.मुंबईतील पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपरपर्यंत धावली. या मेट्रोला प्रवाशांचा हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मेट्रोमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगर जोडले जात असल्याने या मार्गावरील वाहतूककोंडी कमी झाली आहे, तसेच या भागातील नागरिकांना मेट्रोमुळे दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मेट्राेच्या तिकिटांसाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे हाेणारी गर्दी कमी करण्यासाठी व्हाॅट्सॲपवर तिकीट काढण्याचे नियाेजन केले आहे.
मुंबईतील घाटकोपर-वर्सोवादरम्यान धावणाऱ्या ‘मुंबई मेट्रो वन’मधून आतापर्यंत ९० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही सेवा ८ जून २०१४ रोजी सुरू करण्यात आली. या मेट्रोने ८ ते ९ वर्षांत ९० कोटी प्रवाशांना सेवा दिली.
विविध उपक्रम :
मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. मुंबई मेट्रो वनने २०१७ साली मोबाइल क्यूआर तिकीट प्रणाली, व्हॉट्सॲप तिकीट, पेपर क्यूआर तिकीट, अमर्यादित प्रवासासाठी पास इत्यादी सुरू केले.
४०८ फेऱ्या :
मुंबई मेट्रो वनच्या दररोज ४०८ फेऱ्या होतात. त्यात ४.६ लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत दर ३.५ मिनिटांनी आणि ऑफ-पीक अवर्समध्ये दर ८ मिनिटांनी एक मेट्रो धावते. या मेट्रोमुळे शहरी वाहतुकीत परिणाम झाला आहे, तसेच सुरक्षा, स्वच्छता, विश्वासार्हता, आराम आदी गोष्टी मेट्रो प्रवाशांना पुरवत आहेत.
सोलर पॅनलद्वारे वीजनिर्मिती:
या मेट्रो मार्गावरील रेल्वे स्थानकावर २.३० मेगावॅटचा सोलर पॅनल आहे. त्यातून वीजनिर्मिती होते, तसेच सर्व रेल्वे स्थानकांवर २ हजार सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. मेट्रोने पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे, असे मेट्रोचे म्हणणे आहे.