Join us  

पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 12:14 PM

बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

Book My Show CEO Ashish Hemrajani : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुक माय शोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आशिष हेमराजानी आणि कंपनीचे तंत्रज्ञान प्रमुख यांना ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्लेच्या शोच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाच्या संदर्भात दुसऱ्यांदा समन्स बजावले. पहिल्या समन्सला उत्तर न दिल्याने मुंबई पोलिसांकडून हेमराजानी पुन्हा समन्स बजावण्यात आले. त्यानंतर आता आशिष हेमराजानी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

समन्स मिळाल्यानंतर पोलिसांसमोर उपस्थित राहण्याऐवजी हेमराजानी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले होते. हेमरजानी हे फडणवीसांच्या भेटीसाठी आले असले तरी त्यांना भेट नाकारण्यात आल्याची माहिती माध्यमांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित कोल्डप्ले कॉन्सर्टची बुक माय शोवरील तिकीट घोटाळ्याच्या प्रकरणामुळे जोरदार चर्चा सुरु आहे. या कॉन्सर्टची तिकीटे मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत होते. बुक माय शोवर तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. मात्र या तिकीटांचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. २७ सप्टेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर आशिष हेमराजानी हे उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आशिष हेमराजानी यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले. कंपनीच्या तांत्रिक प्रमुखांनी रविवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून आपले म्हणणे मांडले होते. मात्र त्याला हेमराजानी यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार दुसऱ्या समन्सनंतर आशिष हेमराजानी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले होते. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशिष हेमराजानी यांची भेट नाकारली आणि ते मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले. हेमराजानी हे फडणवीस यांच्या बंगल्याच्या शासकीय निवासस्थानाच्या गेटवर देखील चौकशी करत होते, असेही समोर आलं आहे.

मात्र मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेले असताना आशिष हेमराजानी हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी कशासाठी गेले असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हेमराजानी यांच्याकडून या प्रकरणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु असल्याचे म्हटलं जात आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईमुंबई पोलीस