मुंबई - “ नीलमताईंसारखी व्यक्ती निष्पक्षपणे शिवसेनेबद्दल लिहिते तेव्हा ते शिवसेनेला महत्वाचे वाटते.” असे गौरवोद्गार “शिवसेनेतील माझी २० वर्षे” हे आ.डॉ.नीलम गोऱ्हे लिखित पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, मुंबईचे माजी महापौर आमदार सुनील प्रभु, गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे आणि भगिनी जेहलम जोशी मनरंजन प्रकाशनाचे मनोहर सप्रे उपस्थित होते.
२२ फेब्रुवारी १९९८ रोजी आ.डॉ.गोऱ्हे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली व शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. या घटनेला आज २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ‘“शिवसेनेतील माझी २० वर्षे”’ हे पुस्तक आ.डॉ.गोऱ्हे लिखित व मनोहर सप्रे यांच्या मनरंजन प्रकाशन पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना भवन, मुंबई येथे करण्यात आले.
ठाकरे पुढे म्हणाले,” नीलमताई,तुमची २० वर्षे माझ्या डोळ्यासमोर आहेत. आज जरी ही २० वर्षे भरकन उडू गेल्यासारखी वाटत असली तरी,या २० वर्षात पक्षासमोर अनेक आव्हाने होते. यात भली-भली माणसे थकली असती. मात्र नीलमताई जिद्द आणि चिकाटीने पक्षासोबत राहिल्या व पक्षाची त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. आज शिवसेना आणि नीलमताई हे समीकरण पक्क झाला आहे.” यावेळी गोऱ्हे यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीच्या आणि पक्षप्रवेशाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला व गोऱ्हे यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
राऊत यावेळी बोलताना म्हणाले,” जिथे गरज असेल,तिथे नीलमताई सरकारच्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला ओळख मिळाली. यातून नीलमताईंसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती शिवसेनेत आल्या.त्या अतिशय कडवटपद्धतीने काम करतात आणि त्यांच्या कामातून आपल्याला प्रेरणा मिळते.”
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गोऱ्हे म्हणाल्या,” जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा तेव्हा शिवसेना पुढे आली. मग ते मुंबई बाॅबस्फोट प्रकरण असो,लातूरचा भूकंप असो,शिवसेना कायमच पुढे राहिली आहे. लातूर भूकंपाच्या वेळी पीडित विधवा महिलांच्या प्रश्नावर मी काम करत असताना ,शिवसेनेने तेथे केलेलं काम मी त्यावेळी जवळून बघितला. उद्धवजींशी १९९८ साली भेट झाल्यावर त्यांनी बाळासाहेबांशी भेट घडवून दिली. बाळासाहेब आणि उद्धवजींनी महिला प्रश्नांवर माझे विचार समजून घेतले आणि मला साथ दिली. पुढे उद्धवजींनी कायमच महिलांचे सुख दुःख समजून घेतले. कोठेवाडी प्रकरणात सुद्धा उद्धवजी तेथील महिलांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. शिवसेना महिला प्रश्नांवर मोठ्या प्रमाणत लक्ष देत आहे. उद्धवजींचे शेतकरी प्रश्नावरचे काम प्रेरणादायी आहे.” प्रकाशक मनोहर सप्रे यांनी स्वागतपर भाषण केले व पुस्तकाबाबत मत मांडले. या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्रातून पुणे, सांगली, अहमदनगर, नाशिक, मुंबई येथून शिवसैनिक, पदाधिकारी व विविध व्यवसायातील मान्यवर उपस्थित मोठ्या संख्याने उपस्थित होते.