जागेअभावी पुस्तकांना नो एंट्री
By admin | Published: July 3, 2014 02:35 AM2014-07-03T02:35:25+5:302014-07-03T02:35:25+5:30
वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ब्रह्मांड कट्टयांतर्गत वाचन कट्टा अर्थात लोकवाचनालय सुरू करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क नव्हे तर दोन पुस्तके वाचनालयाला देऊन कट्टयाचे सभासद होता येते
स्नेहा पावसकर, ठाणे
वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ब्रह्मांड कट्टयांतर्गत वाचन कट्टा अर्थात लोकवाचनालय सुरू करण्यात आले आहे. कोणतेही शुल्क नव्हे तर दोन पुस्तके वाचनालयाला देऊन कट्टयाचे सभासद होता येते. या उपक्रमाला ठाणेकरांनी पसंती दर्शवून मोठया संख्येने सभासदत्व स्वीकारले होते. मात्र पुस्तके ठेवायला पुरेशी जागाच नसल्याने कट्टयाने सध्या सदस्य नोंदणी प्रक्रिया थांबविली आहे. वाचन कट्टयाला आणि मुख्य म्हणजे आझादनगर प्रवासी महासंघाच्या कार्यालयातील कपाटात असलेल्या पुस्तकांना प्रतिक्षा आहे ती एका ‘आलयाची’.
चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या संकल्पनेतून ब्रह्मांड कट्टयांतर्गत हा उपक्रम दोन वर्षापूर्वी सुरू झाला. दोन किंवा त्याहून अधिक पुस्तके देऊन कट्टयाचे सभासद होता येते आणि मग वर्षभर विनाशुल्क वाचनाचा आनंद लुटता येतो. पुस्तकांची देवाणघेवाण महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी, रविवारी केली जाते. पहिल्या वर्षी या उपक्रमाला प्रतिसाद देत सुमारे ८० सभासदांची नोंदणी झाली होती. तर दुसऱ्या वर्षी सुमारे १५० हून अधिक सभासद नोंदणी झाली. सभासद तसेच इतरही काही ठाणेकर उत्सफूर्तपणे पुस्तके देतात. सध्या कट्टयाकडे ३ ते ४ हजार पुस्तके असून ती आझादनगर प्रवासी महासंघाच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. यावर्षीही काही नवीन सभासदांच्या माध्यमातून पुस्तके मिळणे अपेक्षित होते. परंतु असलेली पुस्तके ठेवायलाच जागा नसल्याने यंदा नोंदणी प्रक्रिया स्थगित केली आहे. ही पुस्तके ठेवण्यासाठी कट्टयाच्यावतीने स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार योग्य जागेची मागणी करण्यात आली आहे. अनेकांनी त्याला सकारात्मक उत्तरही दिले असले तरी त्याची पूर्तता कधी होणार याकडे ठाणेकर वाचकांचे लक्ष लागले आहे.