जूनपासून पुस्तकांना जोडणार वह्यांची पाने; ‘माझी नोंद’ उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2023 09:13 AM2023-03-03T09:13:49+5:302023-03-03T09:14:11+5:30
पुस्तकातील ही पाने ‘माझी नोंद’ या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येत्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्याचा उपक्रम प्रयोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या अंतर्गत प्रत्येक धडा किंवा कवितेच्या नंतर वहीची एक किंवा दोन पाने जोडण्यात येणार आहेत.
पुस्तकातील ही पाने ‘माझी नोंद’ या सदराखाली मुलांनी वापरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी यामध्ये शुद्धलेखन न लिहिता शब्दार्थ, महत्त्वाचे सूत्र, महत्त्वाचे संबोधन, महत्त्वाची वाक्ये, टिपण इत्यादी नोंदणी लिहिणे अपेक्षित आहे. पुस्तकांमधील पानांशिवाय गृहपाठ, वर्गकार्य, सराव यासाठी मुलांना वेगळ्या वह्या ठेवण्याची मुभा असेल. पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, गरीब मुलांना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य परीक्षा मंडळ व बालभारतीचे अधिकारी यांच्यासोबत शिक्षण विभागाने चर्चा केली.
पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडून देण्याविषयीचे सकारात्मक अभिप्राय मिळाल्यामुळे शिक्षण विभागाने पुस्तकांना वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण विभागाच्या सूचना
राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासकीय व अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके ४ विभागांत विभागून तयार करण्यात येऊन त्यामध्ये प्रत्येक धड्यानंतर वहीची पाने जोडण्यात येतील.
पहिली - दुसरी आणि नववी- दहावीची पुस्तके ही प्रत्येकी ४ विभागांत करावी. मात्र पहिली/दुसरीसाठी आवश्यकतेनुसार सरावासाठी आणि नववी / दहावीच्या वैकल्पिक/श्रेणी विषयांसाठी स्वतंत्र पुस्तके असावीत.
पाठ्यपुस्तक मंडळाकडे नियमित पुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपल्यानंतर नवीन पाठ्यपुस्तके ४ भागांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी उपलब्ध करून देण्यात यावीत.
कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किमती निश्चित करण्यात याव्यात.