वर्सोव्यात स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकासाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:43 PM2018-07-21T18:43:33+5:302018-07-21T18:44:18+5:30
आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई - मासेमारीत देशात वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकापासून 7 किमी अंतरावर असलेल्या वेसावे कोळीवाड्याला खूप म्हहत्व आहे.कारण 150 वर्षे देशावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात देशवासियांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यात वेसावे कोळीवाड्यातील 114 स्वातंत्र्य सैनिकांनी हिरीरीने भाग घेतला होता.येथील कोळी महिला देखिल या लढ्यात सामील झाल्या होत्या.त्यांना अनेक वेळा ब्रिटिशांनी अटक देखिल केली होती.तर 1930 च्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ब्रिटिशांच्या विरोधात मिठाच्या सत्याग्रहात येथील स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेऊन "चले जाव" चा बुलंद नारा दिला होता.
येथील स्वातंत्र्यसैनिक पोशा नाखवांची ब्रिटिशांना तर धडकीच भरली होती.आणि त्यांना ब्रिटिशांनी टायगर ऑफ वर्सोवा उपाधी दिली होती.पोशा नाखवांच्या नावाने येथील यारी रोड येथे शाळा आहे.अँड.शांताराम वेसावकर,हिराजी मोतिराम चिखले,गोपीनाथ कास्कर,मंजुळाबाई नामदेव वेसावकर,भालचंद्र तेरेकर,हिराबाई घुस्ते,हरिश्चंद्र घुस्ते,मोतीराम शेंडे यांच्यासह एकूण 114 स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेत्रदीपक कामगिरी केली होती.आज एकही स्वातंत्र्य सैनिक हयात नाही.आजही स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर वेसावे गावात येथील 114 स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक नाही. त्यामुळे वेसावे कोळीवाड्यात स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक उभारण्यासाठी शासनाने नवीन विकास आराखड्यात कलेक्टर लँडची जागा आरक्षित करावी अशी आग्रही मागणी वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मुळेच मुंबईतील 40 कोळीवाड्याचे सीमांकन होत आहे.कोळीवाड्यांसाठी नवीन विकास आराखडा तयार करण्यात येईल आणि कोळीवाड्याचे सीमांकन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम आपण आयोजित केलेल्या जानेवारी 2018 च्या वर्सोवा महोत्सवात केली होती.सलग तीन वर्षे मुख्यमंत्री या महोत्सवाला येत असून त्यावेळी हयात असलेल्या येथील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते 2017 साली आपण केला होता असे त्यांनी सांगितले. मुंबईतील कोळीवाड्यांचे लवकरच सीमांकन होणार असून यामध्ये येथील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकासाठी जागा आरक्षित करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार डॉ.लव्हेकर यांनी शेवटी केली आहे.