- प्राची सोनवणे, नवी मुंबई
घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांना खाण्या-पिण्यासाठीही पुरेसा वेळ मिळत नाही. श्रींची मूर्ती बुकिंग करण्यासाठी आता कार्यशाळेत जाण्याऐवजी घरबसल्या व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून बुकिंग करण्याची सुविधा नवी मुंबईकरांना मिळत आहे. बाप्पाची मूर्ती घरी आणण्यासाठी कार्यशाळेपर्यंतचा प्रवास, आॅफिसला दांडी मारून मूर्तीचा शोध घेणे या गोष्टींमुळे वेळ आणि पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे सीवूड्स येथे राहणारे पंकज पाचपुते, रोहन पाटील या तरुणांनी व्हॉट्सअॅपचा वापर करून गणेशमूर्ती बुक करण्याची अनोखी संकल्पना वास्तवात आणली आहे. व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा, मूर्तीचे फोटो बघा आणि आवडीची मूर्ती आजच बुक करा याप्रकारे या कार्यशाळेचे काम सुरु आहे. गेल्याच आठवड्यात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून या कार्यशाळेतील मूर्ती कर्नाटक राज्यातही पाठविण्यात आल्याची माहिती मूर्तिकार पंकज पाचपुते यांनी दिली. घरबसल्या मूर्ती बुक करता येत असल्याने सर्वच स्तरातून या संकल्पनेचे स्वागत होत असून महिन्याभरात व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून २७ मूर्ती बुक झाल्याची माहिती पाचपुते यांनी दिली. इको फ्रेंडली मूर्तींना मोठी मागणी असल्याचे मूर्तिकार रोहन पाटील यांनी सांगितले. यामध्ये एक फुटापासून ते पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. घरगुती गणेशोत्सवासाठीही हल्ली दोन फुटांहून अधिक उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी आहे. सीवूड्स सेक्टर ४६ आणि नेरुळ सेक्टर २० या दोन परिसरात मोरया गणेश आर्ट कार्यशाळा आहे. याठिकाणी कार्यरत असलेले तरुण मूर्तिकार उच्चशिक्षित आहेत. पंकज पाचपुते यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले तर रोहन पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. असे होते आॅनलाइन बुकिंग...- कार्यशाळेच्या वतीने व्हॉट्सअॅप नंबरची सुविधा पुरविली जाते.- मेसेजमध्ये मूर्तीची उंची, हवा असलेला विशेष अवतार (बाहुबली, बाजीराव, दगडूशेठ, फेटा असलेला आदी) यांचा उल्लेख करणे- मेसेजला प्रतिसाद देत कार्यशाळेच्या वतीने गणेशमूर्तींचे फोटो पाठविले जातात.- या फोटोवरून आवडती मूर्ती निवडून ती निश्चित केली जाते.