पुस्तकांची गाडी दारोदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:44 PM2020-09-09T14:44:42+5:302020-09-09T14:47:21+5:30
लेटस रिड इंडिया फाऊंडेशन कार्यान्वित
मुंबई : समाजामध्ये वाचनाची गोडी वाढावी. वाचनाची रुची वाढावी. गरजूपर्यंत पुस्तक पोहचावीत. मुळात पुस्तके का वाचावित. कोणती पुस्तके वाचावित. पुस्तके कशी वाचावित; याची माहिती देण्यासह खेड्यापाड्यातल्या प्रत्येकापर्यंत पुस्तके पोहचविण्यासाठी लेटस रिड इंडिया फाऊंडेशन कार्यान्वित झाले असून, फाऊंडेशनने मुंबई महानगर प्रदेशात (रायगड) वाचन चळवळीचा श्री गणेशा केला आहे. लोकांनी प्रामाणिकपणे वाचन करावे हा या चळवळीचा उद्देश असून, समाज माध्यमांवर लेटस रिड इंडिया फाऊंडेशनला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीचे श्रेयदेखील फाऊंडेशनने वाचकांना दिले असून, मुंबईतदेखील लवकरच पुस्तकांची गाडी दारोदारी दाखल होणार आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हे फाऊंडेशन सुरु करण्याचे नियोजन होते पण प्रत्यक्षात गेल्या ३ वर्षांपुर्वी हे फाऊंडेशन कार्यान्वित झाले. प्रारंभी अभ्यासक्रमा व्यतीरिक्तची पुस्तके गरजू, गरिब मुलांना देण्यात आली. जानेवारी २०२० मध्ये ट्रस्ट स्थापन झाले; आणि मग समाज माध्यमांवर मोठया वेगाने काम सुरु झाले. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली. लोकांनी वाचावे. कारण लोकांनी वाचले तर आपली प्रगती आहे, यावर लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन ठाम आहे. आता संपुर्ण देशभर पुस्तकांची ही चळवळ उभी करण्याचा मानस आहे. सुरुवातीला तीन राज्यात म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशात ही चळवळ सुरु होणार होती. मात्र कोरोनामुळे सुरुवातीला महाराष्ट्रातीलरायगड जिल्हयात “ग्रंथालय आपल्या दारी” हा उपक्रम सुरु करण्यात आला. आता नवी मुंबईसह लगतच्या प्रदेशात पुस्तकाची गाडी दारोदारी पोहचविण्याचे काम सुरु आहे. पुढील दोन वर्षांत ही चळवळ पुर्ण राज्यात उभी केली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यात समाज माध्यमांवर उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहचविली जात आहे.
हे साधेसुधे ग्रंथालय नाही. ही पुस्तकाची गाडीअत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून यात जीपीएस, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टिम, बारकोड सिस्टम आहे, हे सर्व आपण आपल्या मोबाईल किंवा काॅम्पुटरवरून वापरू शकतो. लेखक, पुस्तक प्रकाशन संस्थांनादेखील पुस्तकांची मदत करेल अशा पध्दतीने पुस्तकांची गाडी कार्यान्वित आहे. पुढील महिन्यात पुस्तकाची दुसरी गाडी आणण्याचा विचार आहे. सध्या एक गाडी ५० किलोमीटरच्या परिसरात फिरत आहे. वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. विशेषत: पुस्तक वाचण्यासाठी शुल्क आकरण्यात येत नाही. अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरिब-होतकरु विद्यार्थी, नोकरी-सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणारी तरुण मुले, वाड्या वस्तीवरील मुलांपर्यंत पहिल्यांदा पुस्तके पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांना खरी गरज आहे, जे पुस्तक विकत घेऊ शकत नसतील किंवा जे पुस्तक आणण्यासाठी बाहेर पडू शकत नसतील किंवा ज्या परिसरांत वाचनालय नसेल त्यांच्यापर्यंत पुस्तक वाचण्यासाठी पोहचते केले जाणार आहे.
वाचकांना कोणती पुस्तके वाचण्यास आवडतील? याची माहिती विविध माध्यामातून गोळा केली जात आहे. कोणती पुस्तके आवडतील. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, आर्थिक, राजकीय, बालसाहित्य, संतवाड:मय, कविता, आत्मचरित्र , स्त्री हक्क आणि समानता, विविध अनुवादित तसेच अनेक अशी वेगवेगळी पुस्तके वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत ५ हजार पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. एका गाडीत २ हजार पुस्तके मावत असून, यातील अद्ययावत सॉफ्टवेअर हे मोठ्या प्रमाणात स्केलेबल असून लाखो पुस्तकांचे आदान प्रदान करण्यास आणि गाड्या चालविता येण्यास सक्षम आहे. सदर ग्रंथालय हे जगातील अद्ययावत अशा प्रकारात मोडणारे आहे. भविष्यात युट्युब चॅनलदेखील सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे तज्ञांतर्फे वाचनाचे धडे दिले जातील.