मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेला बुकी अनिल जयसिंघानी आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अनिल जयसिंघानी, त्याची मुलगी अनिक्षा, चुलत भाऊ निर्मल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत. जयसिंघानी याने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी ठोठावण्यासंदर्भात दिलेला आदेश रद्द करावा. फौजदारी दंडसंहितेतील (सीआरपीसी) कलम ४१, ४१ अ) चे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपली अंतरिम सुटका करण्यात यावी, अशी मागणी जयसिंघानी याने याचिकेद्वारे केली आहे.
कायदेशीर स्पष्टीकरण न देता आरोपींना ठराविक कालावधीपेक्षा अधिक काळ कोठडीत ठेवण्यात आले आहे. आरोपींना उशिरा दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच पोलिसांनी आरोपींना अटक करताना सीआरपीसीतील कलमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींबाबत गंभीर पूर्वग्रह निर्माण झाला आहे, असे जयसिंघानी याने याचिकेत म्हटले आहे.
आपल्याला केलेली अटक बेकायदा असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी जयसिंघानी याने याचिकेद्वारे केली आहे. २७ मार्चला याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे.