मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलिसासह बुकीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:38+5:302021-03-22T04:06:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई / ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या आरोपावरून निलंबित पोलीस शिपाई ...

Bookie arrested with suspended police in Mansukh Hiren murder case | मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलिसासह बुकीला अटक

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी निलंबित पोलिसासह बुकीला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई / ठाणे : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला मदत केल्याच्या आरोपावरून निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे (५१) आणि बुकी रमणिकलाल नरेश गोर (३१) यांना एटीएसने रविवारी अटक केली. मनसुख हिरेन यांचा मृत्यू, त्यांच्या स्कॉर्पिओ मोटारीची चोरी, अँटिलियाजवळ मिळालेली स्फोटके या तिन्ही घटनांचा परस्पर संबंध काय, याचा सखोल तपास आणि त्यासंबंधीचे पुरावेही गोळा करायचे असल्याने दोघा आरोपींना कोठडी देण्याची मागणी एटीएसने ठाणे न्यायालयात रविवारी केली. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएसकडे आल्यानंतर तब्बल १७ दिवसांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने लखनभैय्या बनावट चकमकीत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला, परंतु मे २०२० पासून पॅरोलवर बाहेर असलेला पोलीस शिपाई विनायक शिंदे आणि बुकी रमणिकलाल गोर या दोघांना अटक केली. हा गुन्हा अत्यंत संवेदनशील असल्यामुळे अटक आणि यातील पाहिजे आरोपी सचिन वाझे यांनी केलेल्या गुन्ह्यातील तांत्रिक आणि भौतिक पुरावे नष्ट करण्यासाठी नेमके काय केले, याचा आरोपींकडे सखोल तपास करावयाचा असल्याचे एटीएसने रविवारी ठाणे न्यायालयात सांगितले. वाझे तसेच अटकेतील दोघा आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांचा शोध घेऊन ती जप्त करावयाची आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलचाही शोध बाकी आहे. अटक करण्यात आलेला बुकी नरेश रमणिकलाल गोर (३१) याने वाझे आणि त्याच्या साथीदाराला पाच बेनामी सीमकार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती एटीएसच्या तपासात समोर आली आहे.

* खून नेमका कसा केला?

अटकेतील आरोपींनी हत्येसाठी वापरलेले साहित्य जप्त करायचे आहे. तसेच मनसुख यांच्या अंगावरील सोनसाखळी, पुष्कराज खडा असलेली सोन्याची अंगठी, मनगटी घड्याळ, मोबाइल फोन, पाकीट आणि पाकिटातील डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची विल्हेवाट कशी लावली, त्याचा शोध घेऊन ते जप्त करणे बाकी असल्याचेही एटीएसने सांगितले. आरोपींनी मनसुख यांचा खून नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि कुठे केला? खुनाचा कट कुठे रचला, या कटात आणखी कोण कोण सामील होते काय, या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली.

................................................................

Web Title: Bookie arrested with suspended police in Mansukh Hiren murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.