मुंबई : गुन्हे शाखेने अटक केलेली पांडवपुत्र टोळी एका बुकीच्या हत्येच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती त्यांच्या चौकशीत समोर आली आहे. गुन्हे शाखेने त्यापूर्वीच अटक केल्यामुळे त्यांचा कट फसला. दीपक वालेकर (४४), गणेश सूर्यवंशी (३५), सिद्धार्थ मयेकर (४२), अनिल भुवड (४३), संजय भनागे (४४) आणि जितेंद्र वैष्णवीकर (३३) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वालेकर याने आपल्या टोळीची दहशत वाढविण्यासाठी एका बुकीच्या हत्येचा कट आखला होता. एकाच्या हत्येनंतर १०० बुकी हाती लागतील आणि पैसे देतील या हेतूने हत्येचा कट आखल्याचे समोर आले आहे. त्यांच्या टार्गेटवर कुठला बुकी होता? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
गिरगावातील एका कंत्राटदाराकडे कामाच्या एकूण रकमेच्या ३० टक्के रक्कम खंडणी या टोळीकडून मागण्यात आली हाेती. तक्रारदाराने रक्कम देण्यास टाळाटाळ करताच टोळीने २२ ऑगस्टला कुंभारवाडा परिसरात त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात ते थोडक्यात बचावले. अखेर त्यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेताच या टोळीला २५ ऑगस्ट रोजी पकडण्यात आले.