Join us

बुकिग फुल्ल... रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 7:50 AM

लांबच्या प्रवासाचे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढायला लागलो की, सगळ्या रेल्वेंचे बुकिंग फुल्ल आणि आपण कायमच वेटिंग लिस्टमध्ये असतो.

रवींद्र राऊळ,वृत्तसंपादक

उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळी सण किंवा आणखी काही. लांबच्या प्रवासाचे रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काढायला लागलो की, सगळ्या रेल्वेंचे बुकिंग फुल्ल आणि आपण कायमच वेटिंग लिस्टमध्ये असतो. कोणीतरी सल्ला देतो, ‘अरे, एजंटकडून ब्लॅकने तिकीट मिळेल. घेऊन टाक. नाहीतर प्रवासाच्या प्लॅनवर फुली मार’. मग प्रश्न पडतो आपल्या नशिबी नाही ते तिकीट एजंटला मिळते कसे, याचं उत्तर दडलंय दलालांचं अवाढव्य नेटवर्क आणि काळ्याबाजारात.

रेल्वे तिकिटांच्या काळाबाजारातून होणारी प्रचंड कमाई लक्षात घेता देशभरात हजारो लहान-मोठ्या टोळ्या तिकीट बुकिंगच्या गोरखधंद्यात गुंतल्या आहेत. प्रत्येक टोळीचे मार्ग वेगळे. अगदी तिकीट विंडोवर जाऊन बुकिंगवर हात मारणाऱ्या दलालांपासून एकापेक्षा एक सॉफ्टवेअर वापरत एकगठ्ठा तिकिटे मिळविणारेही आहेत. या सगळ्यांच्या तावडीतून काही तिकिटे सुटलीच तर ती प्रवाशांच्या वाट्याला येतात.

प्रवाशांची संख्या आणि रेल्वेतील जागांचे प्रमाण बहुतेकदा व्यस्तच. त्यामुळे तिकिटांची प्रचंड मागणी लक्षात घेता हा काळाबाजार चालतो. रेल्वेच्या अधिकृत एजंटना ठरावीक कोटा दिलेला असतो. ते रीतसर हा कोटा बुक करतातच, शिवाय थेट प्रवाशांच्या कोट्यावरही हल्लाबोल करतात. म्हणूनच बुकिंग सुरू होताच अवघ्या काही सेकंदातच सगळ्या रेल्वेतील जागा फुल्ल होऊन सर्वसामान्य प्रवाशांना दिसते ती भलीमोठी वेटिंग लिस्ट.

काही अधिकृत एजंट आणि बरेचसे अनधिकृत एजंट नानाविध क्लृप्त्या लढवत बुकिंगचा हा जुगाड खेळतात. साधारण कुठल्या सीझनमध्ये कुठल्या मार्गावरच्या गाड्यांना गर्दी असते, हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. रेल्वेच्या वेबसाइटवर तिकीट बुकिंगसाठी आयडी लागतो. एकावेळी एका आयडीवर ठरावीकच तिकिटे मिळतात. मग जास्तीची तिकिटे मिळवण्यासाठी एजंट बाजारात सहजगत्या मिळणाऱ्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरचा वापर करतात. या सॉफ्टवेअरच्या मदतीने एकाचवेळी शेकडो बनावट आयडी तयार होतात आणि हवी तितकी तिकिटे बुक करणे सोपे जाते. एखाददुसरे ऑनलाइन तिकीट काढायच्या खटपटीत असलेल्या सर्वसामान्य प्रवाशांची पापणी लवेपर्यंत तिकडे बनावट आयडीद्वारे हजारो तिकिटे बिनबोभाट पळवली जातात आणि अगदी काही सेकंदातच वेटिंग लिस्ट झळकू लागते. 

केवळ तोंडदेखली कारवाई रेल्वेचे दक्षता अधिकारी अधूनमधून असे एजंट पकडून कारवाई करतात. पण, ते म्हणजे फाटलेल्या आकाशाला ठिगळ मारण्यासारखेच. कोण, कुठून आणि किती संशयास्पद बुकिंग  करतो हे रेल्वेला समजते, पण ते बुकिंग झाल्यावर. आधीच त्याला प्रतिबंध करण्याची व्यवस्था अजिबात नाही. या रॅकेटची पाळेमुळे इतकी खोलवर आहेत की, त्यांना रोखण्यासाठी अभेद्य तांत्रिक यंत्रणा हवी. ते होईपर्यंत आपण सारे वेटिंगवरच.

बेकायदा कामासाठी खास सॉफ्टवेअर कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, डोंगल, पेन ड्राइव्ह घेऊन कुठल्याही कोपऱ्यात बसून हा बेकायदा धंदा होतो. कुणाला त्याचा मागमूसही लागत नाही. अगदी एखाद्या नेट कॅफेमध्येही हा उद्योग सुरू असतो. कोट्यवधीत खेळणारे काही एजंट असल्या बुकिंगसाठी खास आपल्या सोयीनुसार स्वतःसाठी सॉफ्टवेअर बनवून घेतात. सिंगापूरपासून दुबईपर्यंत असे सप्लायर त्यासाठी तयारच आहेत. काही एजंट तर कॉल सेंटर उभारून कर्मचाऱ्यांमार्फत दे दणादण बुकिंग करतात. मग सर्वसामान्य प्रवासी रांगेतून बाहेरच फेकला जाणारच. 

कसा चालतो काळाबाजार?आता प्रश्न असा येतो की, रेल्वेचे तिकीट अहस्तांतरणीय असताना आणि तिकिटावर प्रवाशांचे नाव, वय नमूद असताना हा काळाबाजार

कसा तडीस जातो? त्यासाठी रेल्वेच्या नियमांना सुरुंग लावण्याचे काम हे एजंट करतात. काहीजण आधीच इच्छुक प्रवाशांकडून जादा रक्कम घेऊन रीतसर त्यांच्या नावे तिकीट बुक करतात, तर बाकीचे बेधडक बनावट नावे, वय टाकून तिकिटे काढतात. विकताना त्या वयोगटानुसार विकतात.प्रश्न राहिला नावांचा. त्यावर सोपा उपाय म्हणजे त्या तिकिटासोबत त्या नावाचे बनावट आधार कार्डही देतात.

पीडीएफ एडिटर प्रोग्रॅमचा वापर करून प्रवासीचा फोटो वापरत हे बनावट आधार कार्ड तयार करणे हा एकदम सोपा खेळ. त्यासाठी खर्चही जवळजवळ शून्यच. कारण ट्रायल बेसवर फुकट मिळणारे असे ऑनलाइन सॉफ्टवेअर पायलीला ५० आहेत. प्रवाशांच्या गर्दीत आधार कार्ड स्कॅन करून खातरजमा करण्याचे काम रेल्वेसाठी कर्मकठीण. मग या धंद्याचे चांगलेच फावते. हे दलाल इतके अमानुष असल्याचे पोलिसांना आढळले आहे की, कॅन्सर पीडितांचाही कोटा त्यांनी सोडला नाही. त्यासाठीही बनावट प्रमाणपत्रे तयार करून त्यांनी विकली.

अशाच सॉफ्टवेअरचा वापर करून तत्काळ कोट्यातील ८५% कोट्यावर हात मारणाऱ्या सोहेल अहमद याला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली होती, तर एकाने त्यासाठी रेल्वेची वेबसाइटच हॅक केली होती.

टॅग्स :रेल्वे