पार्किंगचे बुकिंग आता ‘अ‍ॅप’वर; मुंबई महापालिका देणार पार्किंग माफियांना शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:58 AM2018-07-30T00:58:08+5:302018-07-30T00:58:27+5:30

मुंबई महापालिका पार्किंग माफियांना शह देण्यासाठी सरसावली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका अ‍ॅप आणणार आहे. याची सुरुवात पहिल्यांदा दक्षिण मुंबईतून केली जाणार आहे.

 Booking for parking now on 'app'; Mumbai Municipal Corporation | पार्किंगचे बुकिंग आता ‘अ‍ॅप’वर; मुंबई महापालिका देणार पार्किंग माफियांना शह

पार्किंगचे बुकिंग आता ‘अ‍ॅप’वर; मुंबई महापालिका देणार पार्किंग माफियांना शह

Next

मुंबई : मुंबई महापालिका पार्किंग माफियांना शह देण्यासाठी सरसावली आहे. मुंबई शहरासह उपनगरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका अ‍ॅप आणणार आहे. याची सुरुवात पहिल्यांदा दक्षिण मुंबईतून केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) या तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत दक्षिण मुंबईतील पाच ठिकाणी ‘अ‍ॅटोमॅटिक पार्किंग स्कीम’ राबविण्यात येणार आहे. महापालिकेकडे याकरिता एल अ‍ॅण्ड टीचा प्रस्ताव आला असून, याबाबत महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना विचारणा केली आहे. या योजनेकरिता म्हणजे पथदर्शी प्रकल्पाकरिता आराखडा बनविण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत पार्किंगचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. विशेषत: नवी मुंबई आणि ठाण्यासह पश्चिम आणि पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईकडे वाहत असलेल्या वाहनांची संख्या अधिक आहे. विशेषत: पीक अवरला दक्षिण मुंबईमध्ये वाहनांची वर्दळ अधिक असून, येथे सर्वच कंपन्यांची कार्यालये, बाजारपेठा असल्याने वाहनांच्या संख्येत भरच पडत आहे. परिणामी वाढती वाहने उभी करण्यासाठीची जागा उपलब्ध होत नाही. आणि झाली तरी पार्किंग माफियांकडून वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. परिणामी वाहनचालकांची पिळवणूक होते.

असे असेल नवे अ‍ॅप


वाहन उभे करण्यासाठी अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये आॅनलाइन देयकाचा पर्याय उपलब्ध असणार आहे. या अ‍ॅपमध्ये पार्किंग कुठे आहे? याची माहिती उपलब्ध असणार आहे.
अ‍ॅपद्वारे आगाऊ पार्किंग बुक करता येणार आहे. पार्किंगच्या जागेत वाहन नेताना प्रवेशद्वारावर कोड स्कॅन केल्यानंतर वाहनाकरिता प्रवेशद्वार खुले होईल. पार्किंग केलेले वाहन बाहेर पडल्यानंतर पार्किंगसाठीची रक्कम आॅनलाइनद्वारे घेतली जाईल.
तसेच व्हिडीओचाही आधार घेतला जाणार असून, वाहन उभे करण्यासाठी जागा आहे की नाही? याचा आढावा व्हिडीओद्वारे घेतला जाईल. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी आत आणि बाहेर जाण्यासाठीच्या मार्गावर बारकोड स्कॅनर्स बसविले जाणार आहेत. समजा आपण आपल्या वाहनासाठी अगाऊ जागा बुक केली आहे. मात्र, त्या वेळेला वाहन उभे करण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर संबंधिताला अलर्ट करण्यासाठीची यंत्रणाही कार्यान्वित केली जाणार आहे.
यावर सारासार विचार करत मुंबई महापालिकेने पार्किंगसाठी दक्षिण मुंबईत पाच ठिकाणी अ‍ॅपबेस पार्किंगचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प राबविण्यास अद्याप विलंब असला तरी त्याचा आराखडा बनविण्यासाठी महापालिका सरसावली आहे. परिणामी महापालिकेचा हा प्रयोग कितपत यशस्वी होतो? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे पार्किंगच्या प्रवेशद्वारावर एक कर्मचारीही तैनात असणार आहे. समजा कोणी थेट वाहन आत नेले, तर वाहन उभे करण्यासाठी जागा आहे की नाही? याचाही आढावा घेतला जाईल. प्रवेशद्वारावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीही बसविले जाणार असून, ते थेट महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत.

Web Title:  Booking for parking now on 'app'; Mumbai Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.