दलालांकडून ५९ लाखांच्या रेल्वे ई-तिकिटांची बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 01:07 AM2018-10-29T01:07:54+5:302018-10-29T04:48:33+5:30
रेल्वेच्या दक्षता विभागाने तब्बल ५९ लाख ८१ हजार ८६२ रुपयांच्या ई-तिकीट बुकिंगचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई : आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीसाठी नागरिकांकडून गावी जाण्यासाठी रेल्वे आणि एसटी तिकीट आरक्षण करण्यासाठी लगबग सुरू आहे. पण रेल्वेच्या दक्षता विभागाने तब्बल ५९ लाख ८१ हजार ८६२ रुपयांच्या ई-तिकीट बुकिंगचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी इंद्रजीत गुप्ता या तरुणाला दक्षता विभागाने बेड्या ठोकल्या आहेत.
प्रवाशांकडून वाढीव किंमत घेऊन अनधिकृत दलालांकडून रेल्वे ई-तिकिटांची विक्री होत असल्याची माहिती रेल्वेच्या दक्षता विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे रेल्वे दक्षता विभाग, दादर येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) आणि पनवेलच्या गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी शनिवारी संयुक्त कारवाई केली. कारवाईअंतर्गत मानखुर्द येथून इंद्रजीत गुप्ताला अटक करण्यात आली. इंद्रजीतकडून एक लॅपटॉप आणि ३ स्मार्टफोन हस्तगत करण्यात आले. शनिवारी गुप्ताकडून आगामी तारीख असलेल्या एकूण ४४ रेल्वे ई-तिकीट जप्त करण्यात आल्या. या तिकिटांची किंमत २ लाख १२ हजार ८६७ रुपये आहे. लॅपटॉपची तपासणी केली असता नुकतीच ५७ लाख ६८ हजार ९९५ रुपये किमतीची २०४२ तिकिटे बुक करण्यात आल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी दादर आरपीएफने गुन्हा नोंदवला आहे.